
कोविड-19 (Covid-19) वर्षांमध्ये 20 लाख अतिरिक्त मृत्यूंमुळे, भारतातील सरासरी आयुर्मानाला (Life Expectancy) मोठा फटका बसला आहे. यामुळे पाच दशकांत प्रथमच हळूहळू वाढणारा ट्रेंड उलटला. महाराष्ट्रात, आयुर्मान 2.36 वर्षांनी कमी झाले आहे. महत्वाचे म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांचे आयुर्मान मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) मधील प्राध्यापकांनी केलेल्या आणि 7 मे रोजी सरकारने जाहीर केलेल्या 2021 च्या मृत्युदराच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. साथीच्या काळात आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण, सामाजिक-आर्थिक असमानता आणि मृत्युदरातील वाढ यामुळे ही घट झाल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
अभ्यासानुसार, महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये आयुर्मर्यादा 2.36 वर्षांनी कमी झाली. विशेष म्हणजे, पुरुषांवर याचा जास्त परिणाम झाला, तर महिलांच्या आयुर्मर्यादेवर तुलनेने कमी परिणाम दिसून आला. पुरुषांचा मृत्युदर वाढल्याने भारतातील लिंग आधारित आयुर्मर्यादेतील अंतर 2021 मध्ये आणखी वाढले. हा अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने करण्यात आला. 2019 मध्ये, महाराष्ट्रातील सरासरी व्यक्ती 73.35 वर्षे जगली. 2021 पर्यंत, हे प्रमाण 70.99 वर्षे पर्यंत घसरले. पुरुषांचे आयुर्मान 71.93 वर्षांवरून 68.14 वर्षे झाले, म्हणजेच 3.79 वर्षांनी कमी झाले. त्या तुलनेत, महाराष्ट्रातील महिलांचे आयुष्यमान 0.56 वर्षांनी कमी झाले, म्हणजेच 74.89 वरून 74.33 पर्यंत. (हेही वाचा: Energy Drink May Increase Risk Of Blood Cancer: एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करत असाल तर व्हा सावध! वाढू शकतो रक्ताच्या कर्करोगाचा धोका, अभ्यासात समोर अली धक्कादायक माहिती)
पुरुष मोठ्या प्रमाणावर घराबाहेर काम करतात आणि यामुळे कोविड काळात उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांशी त्यांची जवळीक वाढली. ते कमाई करण्यासाठी आणि अधिक पुरवठा करण्यासाठी बाहेर जात होते, ज्यामुळे त्यांना कोविडचा संसर्ग होण्याचा धोका वाढला. दुसरीकडे, देशातील आयुर्मानात 1.6 वर्षांची घट झाली, जी 2019 मध्ये 70.4 वर्षांवरून 2021 मध्ये 68.8 वर्षांवर आली. राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही फक्त तीन राज्ये 2021 पर्यंत आयुर्मानात माफक वाढ करून यातून वाचली. या आकडेवारीतही, पुरुषांचा वाटा महिलांच्या तुलनेत 2.7 पट जास्त होता.
पुरुषांचे आयुष्यमान 2.2 वर्षे कमी होऊन, 68.9 वर्षांवरून 66.7 वर्षे झाले. दुसरीकडे, महिलांचे आयुर्मान 2019 मधील, 72.1 वर्षांवरून 2021 मध्ये 71.5 वर्षे झाले. अहवालात म्हटले आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये, पुरुषांच्या आयुर्मानात घट महिलांच्या तुलनेत पाच पट जास्त होती. याउलट, आसाम, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी लिंगभेद दिसून आले. या ठिकाणी पुरुषांच्या आयुर्मानातील घट महिलांच्या तुलनेत 1.5 पट कमी होती. अहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये पुरुषांच्या आयुर्मानात घट झाल्यामुळे भारतातील आयुर्मानातील लिंग तफावत आणखी वाढली. महामारीपूर्वीच्या काळात ती 2.8 वर्षांवरून 2021 मध्ये 3.2 वर्षांनी वाढली.