गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करणार; वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

राष्ट्रीय जैविक विविधता मंडळ चेन्नई यांचेकडून जैविक वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्रात नागपूर येथे जैविक विविधता मंडळ कार्यरत असून राज्यातील जैविक विविधतेबाबत ते कामकाज करीत आहे.

गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करणार; वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
वनमंत्री संजय राठोड (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रीय जैविक विविधता मंडळ चेन्नई यांचेकडून जैविक वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्रात नागपूर येथे जैविक विविधता मंडळ कार्यरत असून राज्यातील जैविक विविधतेबाबत ते कामकाज करीत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर गणेशखिंड, पुणे व लांडोरखोरी, जळगाव हे नवीन जैविक वारसा क्षेत्र (Biological Heritage Area) म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड (Forest Minister Sanjay Rathod) यांनी दिली. गणेशखिंड उद्यान, पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे झोनल कृषी संशोधन केंद्र असून येथील, 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

गणेशखिंड, पुणे

गणेशखिंड उद्यान पुणे येथे पिकांच्या 49 जाती, फळांच्या 23 जाती उपलब्ध आहेत. या उद्यानात 35 विविध क्षेत्र असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत. यापैकी काही वृक्ष हे 100 वर्ष जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन 19 जाती विकसित केल्या आहेत. पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले. पुढे राहुरी कृषी विद्यापीठाने या उद्यानाला स्वतःच्या कार्यक्षेत्रात सामावून घेतले. या बागेत 165 प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील 48 वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत.

लांडोरखोरी, जळगाव

लांडोरखोरी जळगाव हे स्थळ मेहरून या गावात स्थित असून मेहरून जलाशयाच्या जवळ आहे. हे स्थळ राखीव वन क्षेत्रात असून जळगाव वन विभागाच्या अखत्यारीत आहे. या क्षेत्रावर बोरीची झाडे असून येथे विविध पक्षी व प्राण्यांचा अधिवास आहे. लांडोरखोरी हे क्षेत्र मोर या पक्षाचे अधिवास केंद्र आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ या सारख्या 70 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. तर रानडुकर, चिंकारा, निलगाय, ससा, मुंगुस, मोर सारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्कर सारख्या सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या 15 पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरीत पक्षांच्या 68 प्रजाती येथे आढळून येतात. (हेही वाचा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत, 20 जुलैअखेर 27.38 लाख खातेदारांना मिळाला 17, 646 कोटी रुपयांचा लाभ)

दरम्यान, राज्यातील अधिकाधिक जैविक वारसा क्षेत्रे शोधून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.अशा प्रकारे जैविक वारसा स्थळे निर्माण केल्याने या क्षेत्रातील प्राणी, पक्षी व वनस्पती संवर्धन योजना तयार करण्यात येऊन प्रजातीचे मूळ स्थळी संवर्धन व वंशवृद्धी करण्यात येते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2020 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).