भाजपच्या गुंडांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रुपात लोकशाहीचीच हत्या केली: अशोक चव्हाण
राजकीय विरोधक हे आपले शत्रू असून त्यांना संपवण्याची नवीन प्रथा भारतीय जनता पक्षाने आणली आहे. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठीच गुंडाना आपल्या पक्षात घेऊन भाजप त्यांना संरक्षण देत आहे, असाही आरोप खा. आशोक चव्हाण यांनी केला आहे.
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची निर्घुण हत्या केली आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या गुंडानी केलेल्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून ही काँग्रेस कार्यकर्त्याच्या रुपात लोकशाहीची हत्या केली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष दुबे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून खा. अशोक चव्हाण म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही असून विचारांचा सामना विचारांनी करण्याची आपली परंपरा आहे. पण राजकीय विरोधक हे आपले शत्रू असून त्यांना संपवण्याची नवीन प्रथा भारतीय जनता पक्षाने आणली आहे. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठीच गुंडाना आपल्या पक्षात घेऊन भाजप त्यांना संरक्षण देत आहे. मनोज दुबे यांनी २०१९ साली देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार येईल अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती त्यामुळे चिडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुबे यांची निर्घृण हत्या केली हे लोकशाहीसाठी दुर्देवी आहे. (हेही वाचा, मुंबई: फेसबुकवरील पोस्टच्या वादातून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात)
राजकीय फायद्यासाठी जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणे लावून सामाजिक वातावरण कलुषीत करण्याचा उद्योग भारतीय जनता पक्ष सुरुवातीपासूनच करत आहे. समाजात द्वेष पसरवून राष्ट्रीय एकात्मता व देशाला कमजोर करण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरु होते. भाजपचे कार्यकर्ते ही या कामात सहभागी आहेत हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. मनोज दुबे यांच्या मारेक-यांना व त्यांच्या मागील सुत्रधारांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2018 02:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

