तुम्हीही विश्वास ठेवता स्मार्टफोनसंदर्भात असणाऱ्या या काही चुकीच्या अफवांवर?
स्मार्टफोन जेव्हापासून आले तेव्हापासून मोबाईल संदर्भात अनेक गोष्टी आपल्या डोक्यात बिंबवल्या गेल्या आहेत, फोन मॉडर्न असला तरी आपण त्याच अफवांवर विश्वास ठेवतो
सध्याच्या डिजिटल युगामध्ये विविध फोन कंपन्यांमध्ये विविधांगी फीचर्स देण्याची चढाओढ दिसून येते. बरेचदा फक्त स्टाईलच्या नावाखाली गरज नसतानाही आपण हे फोन खरेदी करतो. मात्र यातील बऱ्याच तांत्रिक गोष्टी आपणाला माहित नसतात. स्मार्टफोन जेव्हापासून आले तेव्हापासून मोबाईल संदर्भात अनेक गोष्टी आपल्या डोक्यात बिंबवल्या गेल्या आहेत. मात्र कितीही चांगले फोन घेतले तरी त्याच जुन्या गोष्टी आपण आहे तशा अंगीकारतो. स्मार्टफोनबाबतच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. चला जाणून घेऊन काय आहेत या गोष्टी -
> बॅकग्राऊंड अॅप्स बंद केल्याने फोनची क्षमता वाढते – हे पूर्णतः चुकीचे आहे. सध्याच्या सर्व स्मार्टफोन्समध्ये असे फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत ज्यामुळे, बॅकग्राऊंडमध्ये काही काम चालू असेल तरी फोन व्यवस्थित चालतो. त्यामुळे फोनचा स्पीड वाढवण्यासाठी या ट्रिकचा वापर करून काही होणार नाही.
> स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करताना ती फूल चार्ज करा अशी एक अफवा आहे. मात्र जास्तवेळ बॅटरी चार्ज केल्यानंतर तीची ‘बॅटरी लाईफ’ कमी होते. स्मार्टफोन 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करावा. प्रत्येकवेळी 100 टक्के चार्ज केलाच पाहिजे असे नाही.
> जास्त मेगापिक्सल म्हणजे चांगला कॅमेरा – यात काही तथ्य नाही. चांगला फोटो येण्यासाठी फक्त चांगल्या मेगापिक्सलची गरज नसते तर शटर स्पीड, चांगली लाईट, चांगली लेन्स आणि चांगल्या इमेज प्रोसेसरची गरज असते.
> रात्रभर फोन चार्जिंगवर ठेऊ नये – फोनबाबत अजून एक आपल्या मनावर बिंबवली गेलेली चुकीची गोष्ट. जुन्या फोन्समध्ये बॅटरी पूर्ण चार्ज झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. मात्र सध्याच्या मॉडर्न फोन्समध्ये तुमच्या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज झाली आहे हे समजू शकते. ज्या क्षणी तुमच्या फोनची बॅटरी पूर्ण चार्ज होते त्यावेळी फोनला करंट पोहोचणे बंद होते. त्यामुळे तो फोन अतिरिक्त चार्ज घेत नाही.
> दुसरा चार्जर वापरू नये - फोन चार्ज करताना दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने फोन चार्ज करू नका कारण त्यामुळे चार्जिंग जॅक खराब होतो असे म्हटले जाते. मात्र त्या चार्जरची क्षमता आणि तुमच्या चार्जरची क्षमता सारखी असल्यास कोणतेही नुकसान होत नाही.