Financial Assistance to Startups: होतकरु तरुणांच्या स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य शासन करणार 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या पात्रता

राज्यात स्टार्टअप्सना (Startups) चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी, अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली

Nawab Malik (Photo Credits: Twitter)

राज्यात स्टार्टअप्सना (Startups) चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी, अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तरुणांनी त्यांचे कौशल्य, गुणवत्ता आणि नवनवीन संकल्पना वापरुन विकसित केलेल्या स्टार्टअप्सना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविण्यासाठी मोठा खर्च होतो. बरेच होतकरु स्टार्टअप्स या मोठ्या खर्चाअभावी त्यांच्या स्टार्टअपमध्ये गुणवत्ता आणि नाविन्य असूनही पेटंटस् मिळवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात साधारण 125 ते 150 स्टार्टअप्सना 2 ते 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे श्री.मलिक यांनी सांगितले. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी स्टार्टअप्स आणि प्रारंभिक टप्प्यातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे बौद्धिक मालमत्ता हक्क (पेटंट) सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. याकरिता येणाऱ्या खर्चाला सहाय्य करणे या उद्देशाने देशांतर्गत पेटंटसाठी, 2 लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम, तसेच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढ्या रक्कमेचे अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून देण्यात येईल.

ही योजना युटिलिटी पेटंट्स, इंडस्ट्री डिझाईन पेटंट्स, कॉपीराइट्स (संगणक कोडपुरते मर्यादित) आणि ट्रेडमार्क अर्जांची पूर्तता करेल. अर्जदार हा भारत सरकारच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत असावा, देशांतर्गत पेटंटचे एकूण वार्षिक उत्पन्न स्थापनेपासून 1 कोटी रुपयांपेक्षा कमी असावे, तसेच आंतरराष्ट्रीय पेटंटचे एकूण वार्षिक उत्पन्न स्थापनेपासून 5 कोटी रुपयांपेक्षा कमी असावे, अशा यासाठी काही पात्रतेच्या अटी आहेत. स्टार्टअप्सने उभारलेला निधी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास 80 टक्के ऐवजी एकूण खर्चाच्या 50 टक्के मर्यादेपर्यंत नाविन्यता सोसायटी अर्थसहाय्य करेल. (हेही वाचा: उद्योग क्षेत्रात राज्य सरकारची मोठी झेप, 25 कंपन्यांच्या मार्फत 61 कोटींहून अधिक गुंतवणूक)

यासह, स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राच्या खर्चासाठी 2 लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत जी रक्कम कमी असेल तेवढे अर्थसहाय्य करण्यात येईल. या चाचण्या केवळ एनएबीएल/बीआयएस प्रमाणित प्रयोगशाळेतून करणे अनिवार्य असेल. राज्यातील साधारण 250 स्टार्टअप्सना या योजनेतून मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेच्या उद्घाटनानंतर www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात येतील, असे मंत्री श्री.मलिक यांनी यावेळी सांगितले.