Face Recognition Cameras: आता गुन्हेगारांना पकडणे होणार सोपे; मुंबईसह नाशिक व मनमाड रेल्वे स्थानकात बसवले जाणार चेहरा ओळखण्याची प्रणाली
गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी, रेल्वेने चेहरा ओळखण्याची प्रणाली (Face Recognition Cameras) विकसित करणार असल्याची घोषणा केली गेली होती
आता रेल्वे स्थानकामधील गुन्हेगारांचा प्रवेश अवघड होणार आहे. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी, रेल्वेने चेहरा ओळखण्याची प्रणाली (Face Recognition Cameras) विकसित करणार असल्याची घोषणा केली गेली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईचे रेल्वे स्थानक, लवकरच फेस रिकग्निशन कॅमेर्यांनी सुसज्ज होणार आहे. ही प्रणाली गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गर्दीच्या ठिकाणी व्यवस्थापनास मदत करेल.
हे कॅमेरे, हरवलेल्या लोकांना शोधण्यातही मदत करतील. प्रायोगिक तत्त्वावर हे तंत्रज्ञान नाशिक, मनमाड आणि मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात राबविण्यात येणार आहे.
या ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची अंमलबजावणी इतर ठिकाणीही केली जाईल. याअंतर्गत एक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे, जे एका दृष्टीक्षेपात गुन्हेगारांना ओळखेल. त्यानंतर सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये बसलेल्या आरपीएफला त्याची बातमी मॉनिटरवरच मिळेल. इतकेच नाही तर त्यानंतर अलार्मही वाजेल, ज्यामुळे त्या गुन्हेगारास पकडणे सुलभ होईल.
याबाबत बोलताना मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुथार म्हणाले, ‘सध्या ही चेहरा ओळखण्याची यंत्रणा सर्व्हे आणि प्रयोगात्मक पातळीवर आहे. नाशिक, मनमाड आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांवर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. हे तंत्रज्ञान खूप सोपे आहे परंतु तितकेच ते उपयुक्त आहे. चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यात, प्लॅटफॉर्मवर, रेल्वे पुलांवर, प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर बसवले जाईल.’ (हेही वाचा: धक्कादायक! सांताक्रूझ-चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडलं)
नियंत्रण कक्षामध्ये रेल्वेच्या सिस्टममध्ये इच्छित गुन्हेगारी रेकॉर्डसह डेटा फीड केला जाईल. त्यानंतर तो गुन्हेगार कॅमेरामध्ये दिसल्यास लगेचच मुख्य नियंत्रण कक्षाला अलर्ट पाठविला जाईल. या तंत्रज्ञानाचा दुसरा उद्देश म्हणजे, गर्दी व्यवस्थापन. कॅमेर्यामध्ये एकाच ठिकाणी गर्दी झालेली दिसली, ताबडतोब इशारा पाठविला जाईल आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची मदत होईल. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आता भारतातही त्याचा उपयोग होणार आहे.