ABG Shipyard Scam: एबीजी शिपयार्ड घोटाळ्याप्रकरणी मुंबई, सुरत, पुण्यासह अनेक शहरांमध्ये ED चे छापे

बँकेतून घेतलेले पैसे भारतासह परदेशात पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ABG Shipyard Scam (PC- ANI)

ABG Shipyard Scam: एबीजी शिपयार्ड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई सुरूच आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी (ED) ने मुंबई, सुरत, पुण्यासह अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत. एबीजी शिपयार्ड या सर्वात मोठ्या जहाज बांधणी कंपन्यांपैकी एक असलेल्या 28 बँकांमध्ये 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत हे छापे टाकण्यात येत असल्याची माहिती आहे. मंगळवारी ईडीने एबीजी शिपयार्ड, सहयोगी कंपन्या आणि अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली आहे.

सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. बँकेतून घेतलेले पैसे भारतासह परदेशात पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा प्रकार 100 शेल कंपन्यांच्या माध्यमातून केल्याचे तपासात उघड झाले आहे. (हेही वाचा - कळवा पडघा 400 KV ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित)

CBI ने ABG वर ICICI बँकेच्या नेतृत्वाखालील 28 बँकांच्या कन्सोर्टियमची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या कालावधीतील सर्वात मोठी रक्कम ICICI (7,089 कोटी) आहे. त्यापाठोपाठ IDBI (3,639 कोटी), SBI (2,925 कोटी), बँक ऑफ बडोदा (1,614 कोटी) आणि पंजाब नॅशनल बँक (1,224 कोटी) यांचा क्रमांक लागतो.

सीबीआय आणि ईडीने एबीजीचे माजी अध्यक्ष आणि एमडी ऋषी कमलेश अग्रवाल आणि इतर संचालकांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. याआधी 12 फेब्रुवारीलाही सीबीआयने वेगवेगळ्या शहरात छापे टाकले होते. 2018 मध्ये करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये असे दिसून आले की, एप्रिल 2012 ते जुलै 2017 दरम्यान आरोपींनी कट रचला होता आणि निधीच्या गैरवापरासह अनेक बेकायदेशीर कामे केली होती.