Digital Arrest: मुंबईच्या IT कंपनीतील अधिकाऱ्याची 5 दिवस 'डिजिटल अटक'; 6.3 कोटी लुटले, पुणे पोलिसांनी म्हटले 'सर्वात मोठी सायबर फसवणूक'
त्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या बँक खात्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पैशांचा तपशील पाठवण्याची सूचना केली.
मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल 6.29 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा घोटाळा पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत नोंदवलेली सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक असल्याची मानली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत सायबर चोरांनी 59 वर्षीय पीडितेला 9 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पाच दिवस पाषाण येथील त्याच्या घरी, ‘डिजिटल अटक’ मध्ये ठेवले. मनी लाँड्रिंग व्यवहारांची पडताळणी आणि तपासणी, या सबबीखाली त्याची डिजिटल अटक केली गेली. याबाबत पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चोरट्यांनी पीडितेशी मोबाईल मेसेंजर ऍप्लिकेशनद्वारे संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली की, त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याच्या संशयास्पद सहभागासाठी डिजिटल अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी त्याला त्याच्या बँक खात्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पैशांचा तपशील पाठवण्याची सूचना केली. त्यांनी पीडितेच्या तीन बँक खात्यांमधील 6.29 कोटी रुपयांचा तपशील गोळा केला. हा एक चौकशी प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनतर चोरांनी त्याला पैसे हस्तांतरीत करण्यास सांगितले. हे हस्तांतरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार होत असून, चौकशीअंती तो मनी लाँड्रिंगच्या कोणत्याही कृतीत गुंतलेला नसल्याचे समोर आल्यानंतर त्याचे पैसे त्याला परत मिळतील असे आश्वासन दिले गेले. पीडितेने चोरांच्या सूचनांचे पालन केले. ऑनलाइन आणि आरटीजीएसद्वारे चोरांच्या बँक खात्यांमध्ये पाच व्यवहारांमध्ये पैसे हस्तांतरित केले.
त्यानंतर पीडितेने बदमाशांना तो अधिक पैसे ट्रान्सफर करू शकत नसल्याचे सांगितले, यावर त्यांनी त्याला प्रकरण मिटवण्यासाठी 60 लाखांचे कर्ज घे अन्यथा, त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठवू असे सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी आपण अशा अनेकांना तुरुंगात टाकल्याचे चोरांनी सांगितले. पिडीत व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करून चोरांनी त्याला 5 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. नंतर, पीडितेला संशय आल्याने, त्याने बदमाशांशी संवाद साधणे थांबवले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले. परंतु 19 नोव्हेंबरपर्यंत त्याला अटकेबाबत धमकीचे फोन येत राहिले. (हेही वाचा: Fraud Calls: दररोज 1.35 कोटी फसवणूक कॉल थांबवत आहे मोदी सरकार; आतापर्यंत लोकांचे 2500 कोटी रुपये लुटण्यापासून वाचले)
यानंतर पिडीत व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली. डीसीपी विवेक यांनी सांगितले की, चोरटे आणि पीडित यांच्यातील ऑडिओ-व्हिडिओ कॉल्सचे विश्लेषण करण्यासाठी तसेच पैसे कोणत्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले, याचा तपशील तपासण्यासाठी पोलिसांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यांनी दूरसंचार कंपन्या आणि संबंधित बँकांना शक्य तितक्या लवकर कॉल डेटा रेकॉर्ड आणि खात्यांचे स्टेटमेंट प्राप्त करण्यासाठी ईमेल पाठवले आहेत.