New Fungus Strain: देशात फंगसच्या नवीन स्ट्रेनचा उद्रेक; दिल्ली AIIMS मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू, डॉक्टरही आश्चर्यचकित

या रुग्णाला अॅम्फोटेरिसिन बी चे इंजेक्शन देण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही

Fungal infection | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट अद्याप संपलेली नाही तोच देशात बुरशीच्या एका नवीन आणि धोकादायक प्रकाराने (Fungus Strain) दार ठोठावले आहे. राजधानी दिल्लीत फंगसच्या नवीन स्ट्रेनची प्रकरणे आढळून आली आहेत. एम्स दिल्लीतील डॉक्टरांनी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) ग्रस्त दोन रुग्णांमध्ये एस्परगिलस लेंटुलसची पुष्टी केली आहे. सर्व प्रयत्न करूनही फंगसच्या नवीन स्ट्रेनची लागण झालेल्या दोन्ही रुग्णांना वाचवता आले नाही आणि उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, Aspergillus Lentulus ही Aspergillus फंगसची एक प्रजाती आहे जी फुफ्फुसांना संक्रमित करते. बुरशीच्या इतर जातींपेक्षा याचा मृत्यू दर खूप जास्त आहे. अशी प्रकरणे परदेशात नोंदवली गेली आहेत, परंतु डॉक्टरांचे मत आहे की भारतातील या नवीन स्ट्रेनची ही पहिलीच घटना असू शकते. 2005 मध्ये वैद्यकीय साहित्यात बुरशीच्या या नवीन जातीचा प्रथम उल्लेख करण्यात आला होता.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजी (IJMM) मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणाच्या अहवालानुसार, ज्या दोन रुग्णांमध्ये बुरशीचा हा नवीन प्रकार आढळून आला, त्यापैकी एक 50 ते 60 वर्षांचा होता, तर दुसरा रुग्ण 45 वर्षांपेक्षा कमी वयाचा होता. यातील पहिल्या रुग्णावर खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात येत होते, मात्र त्याच्या तब्येतीमध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने त्याला तेथून एम्समध्ये पाठवण्यात आले. रुग्णाला Amphotericin B आणि तोंडावाटे Voriconazole इंजेक्शन्स देण्यात आली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इंजेक्शन दिल्यानंतरही सुमारे महिनाभर रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: कोरोनावर उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी शोधले वनस्पतीपासून तयार केले औषध; अगदी Delta Variant वरही ठरले प्रभावी)

दुसऱ्या रुग्णाला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर एम्सच्या आपत्कालीन रुग्णालयात आणण्यात आले. या रुग्णाला अॅम्फोटेरिसिन बी चे इंजेक्शन देण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. सुमारे एक आठवड्यानंतर, त्याच्या शरीराच्या अनेक भागांनी काम करणे बंद केले आणि रुग्णाचा मृत्यू झाला.