Monkeypox Virus in Semen: 'मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतरही अनेक आठवडे व्यक्तीच्या विर्यामध्ये राहतो विषाणू'- New Study
भारतातही संक्रमणाचा धोका काळानुरूप वाढत आहे. सध्या देशात 9 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे.
सध्या संपूर्ण जग मंकीपॉक्स (Monkeypox) आजाराच्या भीतीच्या छायेखाली आहे. भारतामध्ये ही विषाणूची काही प्रकरणे समोर आली आहेत. लैंगिक संबंधांद्वारे मंकीपॉक्सचा प्रसार होऊ शकतो की नाही यावर बऱ्याच काळापासून तज्ञांमध्ये चर्चा होत आहे. आता अलीकडेच, लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, मंकीपॉक्समधून बरे झाल्यानंतरही हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या विर्यामध्ये (Semen) अनेक आठवडे राहतो. आरोग्य अधिकार्यांचे म्हणणे आहे की हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नाही आणि कोणीही या आजाराच्या संपर्कात येऊ शकतो.
संक्रमित व्यक्तीच्या अंगावरील पुरळ, शरीरावरील स्त्राव, खोकताना आणि शिंकताना तोंडातून बाहेर पडलेले थेंब यामुळे मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीच्या कपड्याला स्पर्श केल्याने निरोगी व्यक्तीला देखील संसर्ग होतो. फ्रान्सिस्का कोलाविटा, इटलीस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या व्हायरोलॉजी लॅबमधील संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक, म्हणतात की, मंकीपॉक्स इतर गोष्टींमधून पसरण्याची शक्यता स्पष्ट आहे, परंतु हा लैंगिक संक्रमित रोग आहे की नाही याचा तपास केला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, आमचे निष्कर्ष असे सूचित करतात की, या आजारातून बरे झाल्यानंतर अनेक आठवडे संक्रमित व्यक्तीच्या वीर्यमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा डीएनए राहतो. मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर भागांवर पुरळ येणे, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, थंडी वाजून येणे, थकवा येणे आणि लिम्फ नोड्स सुजणे यांचा समावेश होतो. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. सध्या मंकीपॉक्सवर कोणताही इलाज नाही. मात्र स्मॉलपॉक्स लसीकरणामुळे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
(हेही वाचा: जाणून घ्या मंकिपॉक्स आजाराची लक्षणं आणि उपचार काय?)
दरम्यान, मे पासून, सुमारे 80 देशांमध्ये 21,000 हून अधिक मंकीपॉक्स प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर डझनभर लोकांनी संसर्गामुळे आपला जीव गमावला आहे. भारतातही संक्रमणाचा धोका काळानुरूप वाढत आहे. सध्या देशात 9 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. यापैकी एका संक्रमिताचा मृत्यूही झाला आहे. मंकीपॉक्सच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने याला 'आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केले आहे.