अशा पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होऊ शकतात विपरित परिणाम
पाणी पिण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि दुष्परिणाम
सर्व शीतपेयांपैकी सर्वोत्तम आणि शरीरास फायदेशीर असे पेय म्हणजे 'पाणी'(WATER). तुम्ही कितीही शीतपेय प्या, रस प्या किंवा अन्य कुठेलेही पेय प्या. पाण्याने जी तहान भागवली जाते. त्याची सर कोणालाच येणार नाही. मात्र हे पाणी कसे प्यावे, किती प्यावे, कशा पद्धतीत प्यावे ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. तहान भागविण्यासाठी गटागटा पाणी पिणे हे जितके घातक तिततेच शरीरास हवे तितके पाणी न पिणेही. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत पाणी पिण्याच्या योग्य आणि अयोग्य पद्धती आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आणि दुष्परिणाम:
पाणी पिण्याची अयोग्य पद्धत आणि त्याचे तोटे:
1. कधीच उभे राहून पाणी पिऊ नये. याचे मुख्य कारण म्हणजे उभे राहून पाणी प्यायल्यास आपली तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभ्याने पाणी प्यायल्यास ते वेगाने शरीरातून वाहून जाते. त्यामुळे किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. जेणेकरुन मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते. उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.
2. पाणी एकदम अथवा घाईघाईत पिऊ नये. त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
3. फ्रिजमधील खूप थंड पाणी पिऊ नका. अतिथंड पाणी पिणे शरीरास घातक असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते. कारण थंड पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया आकुंचन पावतात. थंड पाण्यामुळे तुमच्या श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो. या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो. ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढू शकते.
4. आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे. जेवण केल्यानंतर आपल्या जठरामध्ये मंदाग्नी तयार झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते. जेवण झाल्या झाल्या आपण पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अडचण निर्माण होते.व अन्न पचण्याऐवजी सडते. त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी प्यायले पाहिजे. तसेच पाणी जेवणाआधी पिणेही योग्य नाही. जेवणाअगोदर अर्धा तास तरी पाणी पिऊ नये.
पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे:
1. बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक (स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणारे काम) प्रक्रिया आराम आणि पचन मोडवर असते. त्यामुळे अन्नपचन आणि शारीरिक प्रक्रियांसाठी पाण्याचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.
2. सकाळी उठल्या उठल्या 1-2 ग्लास गरम अथवा कोमट पाणी प्यावे. हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे अॅसिडीटी चा त्रास होत नाही. पोट साफ राहते. थंड पाणी हे शरीराला हानीकारक असते. रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे.त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आजार कमी होतात.पित्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो.त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.
3. पाणी एका जागी शांतपणे बसून हळूहळू पाणी प्यावे.
उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
या गोष्टी लक्षात घेऊन योग्यरित्या पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही विपरित परिणाम होणार नाही. शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते.
(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय
सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला
घेणे आवश्यक आहे.)