आज सुट्टीचा वार रविवार असल्याने कराड येथील काही तरुण केळवली धबधबा पाहण्यासाठी गेले होते. या धबधब्याच्या खोल डोहात पोहण्यासाठी उतरले असता एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. धबधब्याच्या तीव्र प्रवाहामुळे रेस्क्यू टीमला अडथळा येत होता. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळावरून व पोलिसांनी सांगितले, की रविवारी दुपारच्या सुमारात केळवली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. काही पर्यटक धबधब्याच्या दिशेने डोहाकडे गेले होते. त्यातील काही तरुण धबधब्याच्या खोल डोहात पोहण्यासाठी उतरले असता त्यातील एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला. (हेही वाचा - Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण)
या घटनेची माहिती तालुका पोलीस स्टेशनला मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम शोध कार्याला लागली. मात्र, धबधब्यावरून पडणाऱ्या तीव्र प्रवाहामुळे शोध कार्याला अडथळे येत होते. शोध कार्यासाठी डोहात गेल्यानंतर बोट पाण्याने भरत होती.
धबधब्याच्या वरून पडणाऱ्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे डोहात मोठा भोवरा निर्माण होत होता. त्यामुळे शोधक कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटीलाही अडचण येत होती. धबधब्याचा डोह हा 15 ते 20 फूट खोल आहे. शिवाय डोहात मोठे दगड असल्याने शोध कार्यात वापरण्यात येणारा अँकरही दगडात अडकत होता. हा तरुण कराड येथील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या तरुणांची ही माहिती समजू शकली नाही.