Punjab: अमृतसरजवळील विहिरीत सापडले 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे; 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात झाले होते शहीद

ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या काही भारतीय सैनिकांनी धार्मिक श्रद्धेचा हवाला देऊन डुकराचे मांस आणि गोमांसापासून बनवलेल्या काडतुसांच्या वापराविरुद्ध बंड केले होते

Skeletons of 282 Indian soldiers found during excavation in Amritsar (Photo:ANI)

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 61 वर्षांपूर्वी त्याच धर्तीवर पंजाबमधील अजनाला गावात एक नरसंहार झाला होता. आता या नरसंहाराबाबत 165 वर्षांपासून दफन केलेले सत्य समोर आले आहे. पंजाब विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. जे.एस. सेहरावत यांनी सांगितले की, 1857 मध्ये देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या 282 भारतीय सैनिकांचे सांगाडे अमृतसरजवळ उत्खननात सापडले आहेत. 1857 मध्ये देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या या 282 भारतीय सैनिकांनी डुकराचे मांस आणि गोमांस यांपासून बनवलेल्या काडतुसांच्या विरोधात बंड केले होते.

सहाय्यक प्राध्यापक म्हणाले की, हे सांगाडे 1857 मध्ये ब्रिटिशांविरुद्धच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या 282 भारतीय सैनिकांचे आहेत. पंजाबमधील अमृतसरजवळील अजनाला येथे एका विहिरीमध्ये हे सापडले आहेत. बीएचयुचे प्रो. ज्ञानेश्वर चौबे, पंजाब विद्यापीठाचे डॉ. जे. एस. सेहरावत आणि बिरबल साहनी इन्स्टिट्यूट, लखनऊचे डॉ. नीरज राय यांनी शहीद जवानांच्या हाडे, कवटी, दात यांचे 50 डीएनए नमुने आणि 85 समस्थानिक विश्लेषणातून असे आढळून आले आहे की, ते झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातील आहेत. यासह झारखंडमधील नऊ आदिवासींच्या अस्तित्वाचे पुरावे 50  एनए नमुन्यांच्या तपासणीत सापडले आहेत. (हेही वाचा: ताजमहालच्या जमिनीवर सांगितला जयपूर राजघराण्याने हक्क; आपल्याकडे कागदपत्रे असल्याचा भाजप खासदार Diya Kumari यांचा दावा)

2014 मध्ये अजनाला शहरातील विहिरीत (कालियनवाला खोह) मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले होते. हे सांगाडे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत मारल्या गेलेल्या लोकांचे होते, असे इतिहासकारांचे मत होते. मात्र आता 8 वर्षानंतर याचे सत्य समोर आले आहे. दरम्यान, काही इतिहासकार 1857 च्या उठावाला देशाचा पहिला स्वातंत्र्यलढा मानतात. ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या काही भारतीय सैनिकांनी धार्मिक श्रद्धेचा हवाला देऊन डुकराचे मांस आणि गोमांसापासून बनवलेल्या काडतुसांच्या वापराविरुद्ध बंड केले होते. या संघर्षाचे नेतृत्व मंगल पांडे यांनी केले होते.