Online Fraud: सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना तब्बल 40 टक्के भारतीयांची फसवणूक; अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती

अहवालात दिसून आले आहे की, ऑनलाइन खरेदी करताना सर्वेक्षणकर्त्यांचे सरासरी 6,216 रुपयांचे नुकसान झाले आहे.

Online Fraud | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

सणासुदीचा कालावधी हा शॉपिंगसाठी उत्तम काळ मानला जातो. या काळात अनेक कंपन्या, ऑनलाईन साईट्स आपल्या उत्पादनांवर भरपूर सवलती देत असतात. नुकतेच नवरात्र आणि दिवाळीच्या काळात लोकांनी मनोसोक्त खरेदी केली. परंतु सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी (Online Shopping) करताना सुमारे 40 टक्के भारतीयांची फसवणूक झाली आहे. एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. हा अभ्यास सायबर सिक्युरिटी मध्ये ग्लोबल लीडर नॉर्टनकडून द हॅरिस पोल द्वारे आयोजित करण्यात आला होता.

त्यांनी भारतीय निष्कर्ष प्रकाशित केले होते. या अभ्यासामध्ये सणासुदीच्या काळात सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन खरेदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शोधला होता. निष्कर्षांनुसार, सर्वेक्षण केलेल्या दोन तृतीयांश भारतीय प्रौढांना त्यांच्या वैयक्तिक तपशिलांशी तडजोड झाल्याबद्दल चिंता होती (78 टक्के), थर्ड पार्टी रिटेलरकडून फसवणूक झ्ल्याची भीती 77 टक्के ग्राहकांनी व्यक्त केली, 72 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना जुने उत्पादन नुतनीकरण करून मिळाले आणि 69 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना भेट म्हणून मिळालेले उपकरण हॅक केले गेले.

नॉर्टनलाइफलॉक येथील नॉर्टन संचालक भारत आणि सार्क देश रितेश चोप्रा म्हणाले, अलीकडे ऑनलाइन खरेदीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि त्यासोबतच ऑनलाइन खरेदी घोटाळे, गिफ्ट कार्ड फसवणूक, पोस्टल डिलिव्हरी फसवणूक यामध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीय प्रौढांपैकी जवळपास 78 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या कनेक्ट केलेल्या उपकरणांद्वारे ऑनलाइन वेळ घालवणे त्यांना सणासुदीच्या काळात अधिक कनेक्ट होण्यास मदत करते आणि 74 टक्के लोक म्हणतात की, यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. (हेही वाचा: UPI Wrong Transaction: यूपीआयद्वारे चुकीचे ट्रांजेक्शन झाले असेल तर घाबरू नका; 'अशी' करा तक्रार)

अहवालात नमूद करण्यात आले आहे की 65 टक्के भारतीय प्रौढ लोक म्हणतात की, सणासुदीच्या काळात त्यांच्या कनेक्ट केलेल्या उपकरणांमध्ये प्रवेश न केल्यास त्यांची मानसिक स्थिती बिघडते. अहवालात दिसून आले आहे की, ऑनलाइन खरेदी करताना सर्वेक्षणकर्त्यांचे सरासरी 6,216 रुपयांचे नुकसान झाले आहे.