Guidelines For Coaching Sector: कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बसणार आळा; विद्यार्थ्यांची फसवणूक रोखण्यासाठी सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
यासंदर्भात सीसीपीएतर्फे विविध कोचिंग सेंटर्सना 45 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच 18 कोचिंग सेंटर्सना सीसीपीएने 54 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना फसव्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
Guidelines For Coaching Sector: ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, 2024,’ चा उद्देश सामान्यतः कोचिंग सेंटर्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या फसव्या मार्केटिंग पद्धतींपासून विद्यार्थी आणि जनतेचे संरक्षण करणे हा आहे, असे सीसीपीएच्या मुख्य आयुक्त आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली येथे या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
मार्गदर्शक तत्त्वांमधील काही महत्त्वाच्या व्याख्या-
- ‘कोचिंग’मध्ये शैक्षणिक मदत, शिक्षण, मार्गदर्शन, सूचना, अभ्यास कार्यक्रम किंवा शिकवणी किंवा तत्सम स्वरूपाचे इतर कोणतेही काम समाविष्ट आहे मात्र समुपदेशन, क्रीडा, नृत्य, नाट्य आणि इतर सर्जनशील उपक्रम समाविष्ट नाहीत.
- ‘कोचिंग सेंटर’ म्हणजे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेले, चालवलेले किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे प्रशासित केंद्र आहे.
- दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती , 2022 च्या अनुमोदनाच्या कलम 2(f) अंतर्गत प्रदान केल्याप्रमाणे ‘समर्थक’ चा अर्थ असेल;
खोटे/दिशाभूल करणारे दावे, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या श्रेयांकाविषयी अतिशयोक्तीपूर्ण माहिती आणि कोचिंग संस्थाकडून अनेकदा विद्यार्थ्यांवर लादल्या जाणाऱ्या अयोग्य करारांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे, महत्त्वाची माहिती लपवून त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकणे, खोटी हमी देणे आदी प्रकार घडल्याचे आढळून आले आहे.
कोचिंगमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीला म्हणजे केवळ कोचिंग सेंटर्सच नव्हे तर जाहिरातींद्वारे त्यांच्या सेवांचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही समर्थक किंवा प्रसिद्ध व्यक्तींनाही ही मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. समर्थनकर्ते, जे त्यांचे नाव किंवा प्रतिष्ठा कोचिंग सेंटर्सना देतात, ते आता त्यांनी समर्थन केलेले दावे अचूक आणि सत्य आहेत याची खातरजमा करण्यासाठी जबाबदार असतील. कोचिंग संस्थांची प्रसिद्धी करणाऱ्या समर्थकांनी ते करत असलेल्या दाव्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. जर त्यांनी यशाचे खोटे दावे किंवा दिशाभूल करणाऱ्या हमींचे समर्थन केल्यास, त्यांनाही कोचिंग केंद्रांसोबतच जबाबदार धरले जाईल. (हेही वाचा: PM Internship Scheme: केंद्र सरकारने सुरु केली पंतप्रधान इंटर्नशिप योजना; टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी, 10 नोव्हेंबरपर्यंत करू शकाल अर्ज)
मार्गदर्शक तत्त्वांची काही ठळक वैशिष्ट्ये-
- जाहिरातींचे नियमन: मार्गदर्शक तत्त्वे कोचिंग संस्थांना संबंधित खोटे दावे करण्यास स्पष्टपणे प्रतिबंधित करतात.
उपलब्ध अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, प्राध्यापक पात्रता,शुल्क आणि परतावा धोरणे.
निवड दर, यशोगाथा, परीक्षा क्रमवारी आणि नोकरीच्या सुरक्षिततेची आश्वासने.
खात्रीपूर्वक प्रवेश, परीक्षेतील उच्च गुण, खात्रीशीर निवड किंवा पदोन्नती.
- प्रामाणिक प्रतिनिधित्व: त्यांच्या सेवांच्या गुणवत्तेबद्दल किंवा मानकांबद्दल दिशाभूल करणारे प्रतिनिधित्व याला कठोर प्रतिबंध आहे. कोचिंग संस्थांनी त्यांच्या पायाभूत सुविधा, संसाधने आणि सुविधा अचूकपणे मांडलेल्या असाव्यात.
- विद्यार्थ्यांच्या यशोगाथा: एका उल्लेखनीय घडामोडीद्वारे, या मार्गदर्शक तत्वांद्वारे कोचिंग सेंटर्सना त्यांच्या जाहिरातीत विद्यार्थ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांची नावे, छायाचित्रे, प्रशस्तीपत्रके यांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्याला यश मिळाल्यानंतरच अशी लेखी परवानगी मिळवता येईल. अनेकदा विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच अशा प्रकारच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह केला जातो आणि त्यामुळे संस्थेत प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ज्या दबावाचा सामना करावा लागतो ते कमी करण्याच्या उद्देशाने ही तरतूद करण्यात आली आहे.
- पारदर्शकता आणि प्रकटीकरण: कोचिंग सेंटर्सनी त्यांच्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्याच्या छायाचित्राशेजारी त्याचे/तिचे नाव, श्रेणी आणि अभ्यासक्रमाचे तपशील लिहिणे आवश्यक करण्यात आले आहे. विद्यार्थ्याने त्या अभ्यासक्रमासाठी शुल्क भरले होते अथवा नाही हे देखील स्पष्टपणे नमूद करावे लागेल. त्यासोबतच, जर एखादे अस्वीकरण लिहायचे असेल तर ते इतर महत्त्वाची माहिती लिहिलेल्या अक्षरांच्या आकारातच लिहावे लागेल जेणेकरून बारीक अक्षरातील मजकुरामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
- खोटी तातडी दर्शवता येणार नाही: विद्यार्थ्याला तातडीने निर्णय घेण्यासाठी दबावतंत्र म्हणून कोचिंग व्यवसायात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या, प्रवेशासाठी मर्यादित जागा शिल्लक असणे अथवा मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी अर्ज आलेले असणे यांसारखी कोणत्याही प्रकारची खोटी तातडी अथवा चणचण निर्माण करण्यासारख्या युक्त्यांना या मार्गदर्शक सूचनांमुळे लगाम घालण्याचे मार्गदर्शक तत्वांचे लक्ष्य आहे.
- राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनशी एकत्रीकरण: प्रत्येक कोचिंग सेंटरला राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनशी भागीदारी करावी लागेल जेणेकरून दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीच्या व्यवसाय पद्धतींबाबतच्या चिंता अथवा तक्रारी दाखल करणे विद्यार्थ्यासाठी सुलभ होईल.
- योग्य पद्धतीचे करार: बहुतेकदा कोचिंग सेंटर्सद्वारे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येत असलेल्या अयोग्य पद्धतीच्या करारांची समस्या देखील या मार्गदर्शक तत्वांद्वारे सोडवण्यात आली आहे. विद्यार्थ्याची निवड-पश्चात संमती घेतल्याशिवाय या कोचिंग संस्थांना यशस्वी उमेदवाराची छायाचित्रे, नावे किंवा प्रमाणपत्रे यांचा वापर करण्याची परवानगी नाही. कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेताना अनेक विद्यार्थ्यांना या ताणाला तोंड द्यावे लागते तो ताण दूर करण्याच्या हेतूने ही तरतूद करण्यात आली आहे.
- सक्तवसुली आणि दंड: उपरोल्लेखित मार्गदर्शक तत्वांचे पालन न झाल्यास हे ग्राहक संरक्षण कायदा, 2029चे उल्लंघन मानण्यात येईल. अशा वेळी केंद्रीय प्राधिकरणाला दोषींविरुद्ध दंड, जबाबदारीची सुनिश्चितता तसेच अशा चुकीच्या पद्धतींच्या पुनरावृत्तीला प्रतिबंध यांसह कठोर कारवाईचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
कोचिंग सेंटर्सकडून केल्या जाणाऱ्या फसव्या जाहिरातींविरुद्ध सीसीपीएने स्वतःहून कार्यवाही केली आहे. यासंदर्भात सीसीपीएतर्फे विविध कोचिंग सेंटर्सना 45 नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. तसेच 18 कोचिंग सेंटर्सना सीसीपीएने 54 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना फसव्या जाहिराती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.