India-Myanmar-Thailand Trilateral Highway: भारत-म्यानमार-थायलंड महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण; केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी दिली माहिती
हा महामार्ग मणिपूरमधील मोरेहला म्यानमारमार्गे थायलंडमधील माई सोटला जोडेल.
India-Myanmar-Thailand Trilateral Highway: भारत-म्यानमार-थायलंडमधून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी दिली. भारत, म्यानमार आणि थायलंड सुमारे 1,400 किमी लांबीच्या महामार्गावर काम करत आहेत. त्याच्या पूर्णत्वामुळे आग्नेय आशियाशी जोडलेल्या देशांमधील व्यापार, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळेल.
प्रकल्पाच्या प्रगतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, प्रकल्पाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग मणिपूरमधील मोरेहला म्यानमारमार्गे थायलंडमधील माई सोटला जोडेल. (हेही वाचा -Delhi-Mumbai Akasa Air Flight च्या महिला प्रवाशाकडे आढळली जीवंत काढतुसं; दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात)
या महामार्गाच्या कामाची अंतिम मुदत किती आहे, याबाबत सद्यस्थितीत मंत्र्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. या मोक्याच्या महामार्गाच्या प्रकल्पाबाबत बोलायचे झाले तर त्याला विलंब झाला आहे. डिसेंबर 2019 पर्यंत हा महामार्ग कार्यान्वित करण्याचे सरकारचे लक्ष्य होते.
हा त्रिदेशीय महामार्ग कोलकाता येथून सुरू होऊन उत्तरेकडील सिलीगुडीपर्यंत जाईल. येथून श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करेल. त्यानंतर दिमापूर येथून नागालँडमध्ये प्रवेश करेल आणि मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेहून म्यानमारमध्ये प्रवेश करेल. म्यानमारमधील मंडाले, नेपीडॉ, बागो, यंगून आणि म्यावाड्डी या शहरांमधून माई सोट मार्गे थायलंडमध्ये शेवटी प्रवेश करेल.