मराठीतील वादग्रस्त नाटके; ज्यांनी रंगभूमी ढवळून टाकली

या संघर्षाची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सापडतील.

मराठी रंगभूमीला फार मोठा इतिहास आहे. हा इतिहास इतका मोठा की, आज चित्रपटांचा भव्य पडदा आणि वेबसीरिजचा इंटरनेटवरील कवेत न येणारा जगव्यापी पडदा हाताशी असतानाही नाटकांवरचे रसिकांचे प्रेम कायम आहे. अर्थात, बदलती समाजव्यवस्था, अर्थकारण, जगण्यातील स्पर्धा यांचा नाट्य व्यवसाय आणि नाटकाला होणाऱ्या गर्दीवर नक्कीच प्रभाव पडलेला दिसतो. पण, तरीही नाटक आणि मराठी रसिक यांचे प्रेम कायम आहे. दरम्यान, मराठी नाट्यसृष्टीचा हा प्रवास तितका साधा आणि सरळही नाही. त्यात अनेक चढउतार आले. मराठी नाटक आणि वाद हा सुद्धा स्वतंत्र अभ्यासाचा विषय. मराठी नाटकांनी अनेकदा समाजव्यस्था, त्यातील अंतर्विरोध, प्रश्न, रुढी-परंपरा यांवर कोरडे ओढले आहे. तर, कधी गंभीर प्रश्नही निर्माण केले . अशी नाटके जेव्हा जेव्हा रंगभूमीवर आली तेव्हा, ही नाटके आणि समाजातील कर्मठ (परंपरावादी) मंडळींशी त्यांचा संघर्ष झाला. या संघर्षाची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सापडतील. अशाच काही गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या नाटकांविषयी...

सखाराम बाईंडर..

'सखाराम बाईंडर' हे श्रेष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साखारलेले एक समृद्ध नाटक. समाजात घडणाऱ्या पण उघपणे न बोलल्या जाणाऱ्या स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणारे असे हे नाटक. हे नाटक स्त्रीवादी दृष्टीकोन केंद्रस्थानी ठेऊन लिहिले आहे. हे नाटक जेव्हा रंगभूमिवर आले तेव्हा, प्रचंड वाद निर्माण झाला. अर्थात, या नाटकात तेंडूलकरांनी हाताळलेला विषयही तितकाच स्फोटक होता. पण, तो तेंडूलकरांची एकूण लिखाणाची धाटणी पाहिली तर, अपेक्षित असाच होता. निळू फुले आणि लालन सारंग यांनी मुख्य व्यक्तिरेखा साखारलेले हे नाटक इ.स.१९७२मध्ये पहिल्यांदा रंगभूमिवर आले. पुढे सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनीही हे नाटक केले. समाजातील विशिष्ट विर्गाकडून प्रचंड विरोध होऊनही हे नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. विशेष म्हणजे या नाटकाचे इंग्रजीतही भाषांतर झाले. तसेच, न्यूयॉर्कच्या नाट्यगृहांमध्ये या नाटकाचे प्रयोग दीर्घकाळ होत राहिले. महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक ठिकाणी हे नाटक वाद-विवाद आणि त्यात हाताळलेल्या विषयांमुळे चर्चेत राहिले.

घाशीराम कोतवाल

विजय तेंडूलकर, नाटक आणि वाद जणू हे एक समिकरणच. तेंडूलकरांनी जेवढी नाटकं लिहिली त्यातील बहुतांश नाटकं ही वादग्रस्तच ठरली. अगदी हा वाद न्यायालयांपर्यंत गेला. अर्थात, न्यायालयाचा निकाल नाटकांच्याच बाजूने लागला, हेही तितकेच खरे. विजय तेंडूलकर लिखीत 'घाशीराम कोतवाल' हे नाटकही असेच वादग्रस्त. महाराष्ट्राच्या सामाज-जिवनात या नाटकाने प्रचंड वादळ माजवलं. पुण्यातील 'प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन' या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने १६ डिसेंबर १९७२ मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग केला. ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल या दोन या नाटकातील व्यक्तिरेखा. ज्यांच्याभोवती नाटकाचे कथानक फिरते. हे नाटक जातीयवादी , इतिहासाचा विपर्यास करणारे असल्याचे अनेक आरोप या नाटकांवर झाले. त्यावरून मोठा वाद आणि नाटकाला विरोधही झाला. पण, हे नाटक रसिकांच्या हृदयात स्थान मिळविण्यात यशस्वी झाले. ‘अनैतिहासिक दंतकथा’ असा उल्लेख स्वत: तेंडूलकरांनीच या नाटकाच्या प्रस्तावनेत केला आहे. पण, नाटकातील पात्रे ऐतिहासिक असल्याने त्याचा जनमानसावर मोठा परिणाम झाला.

मी नथूराम गोडसे बोलतोय

प्रदीप दळवी लिखीत 'मी नथूराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे दिग्दर्शन दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी केले आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी या नाटकात साकारलेली नथूराम गोडसेची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. पण, महात्मा गांधींची हत्या केलेल्या नथूराम गोडसेचे या नाटकातून उदात्तीकरण केल्याचा आरोप या नाटकावर करण्यात आला. या मुद्द्यावरुन हे नाटक प्रचंड वादग्रस्त ठरले. टीका, विरोध आणि समर्थन असा संमिश्र पाऊस लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सर्वांवरच पडला. श्रीराम लागू, विजय तेंडूलकर, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर यांसारख्या दिग्गजांनीही या नाटकावर तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.

शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला

सध्याच्या घडीला अत्यंत वादग्रस्त ठरलेले असे हे नाटक. या नाटकालाही समाजातील काही मंडळींनी जोरदार विरोध केला. पण, असे असले तरीही या नाटकाचे नाट्यग्रहांमधून अनेक प्रयोग झाले आहेत. होत आहेत. प्रचंड विरोध आणि टीका होऊनही या नाटकाला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भगवान मेदनकर यांची निर्मिती असलेले हे नाटक राजकुमार तांगडे यांनी लिहिले आहे. तर, नंदू माधव यांनी हे नाट दिग्दर्शीत केले आहे. मंगेश नगरे संकल्पना गीत संगीत – संभाजी भगत हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

एक चावट संध्याकाळ

नाटकाच्या नावावरुनच आपल्या लक्षात आले असेल हे नाटक का वादग्रस्त ठरले असेल. लेखक आणि दिग्दर्शक अशोक पाटोळे यांनी हे नाटक लिहीले आहे. इंटरनॅशनल थिएटर ग्रूप इंडिया अनलिमिटेडची निर्मिती असलेले हे नाटक प्रचंड वादग्रस्त ठरले. या नाटकाच्या जाहिरातीत 'फक्त प्रौढ पुरुषांसाठी' ही टीप वादाचे कारण ठरले. या नाटकाला केवळ पुरुषांनाच प्रवेश दिला जात असल्याने स्त्री-पुरुष असा भेद केला जात आहे. या नाटकास महिलांना प्रवेश का नाही, असा मुद्दा उपस्थित झाल्याने हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर या नाटकाला महिलांनाही प्रवेश खुला केल्याने वाद निवळला.