World's First Flex-Fuel Car: नितीन गडकरींनी लॉन्च केली जगातील पहिली फ्लेक्स-इंधन कार Innova HyCross; इथेनॉल आणि इलेक्ट्रिक एनर्जीवर चालणार, जाणून घ्या सविस्तर

ही कार पर्यायी इंधनावर चालेल. म्हणजेच ही कार स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करू शकते, त्यानंतर ती ईव्ही मोडवरही चालू शकते.

World's First Flex-Fuel Car (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशाचे पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हायड्रोजन, फ्लेक्स-इंधन, जैवइंधन इत्यादी पर्यायी इंधनांच्या वापरावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भर देत आहेत. त्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आज गडकरींनी जगातील पहिली BS-VI (स्टेज-II), इलेक्ट्रिक फ्लेक्स-इंधन कार (World's First BS-VI (Stage-II) Electrified Flex-Fuel Vehicle) भारतात लॉन्च केली आहे. ही कार टोयोटा इनोव्हा आहे, ज्याला इनोव्हा हायक्रॉस असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी 100% इथेनॉल-इंधनावर चालेल. ही कार जगातील पहिली BS-VI (स्टेज-II), इलेक्ट्रीफाय फ्लेक्स-फ्युअल कार असेल. यातून 40 टक्के वीजनिर्मितीदेखील होऊ शकते. त्यामुळे इथेनॉलची प्रभावी किंमतही लक्षणीयरीत्या कमी होईल.

याआधी 2022 मध्ये, गडकरींनी टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी कार लॉन्च केली. ग्रीन हायड्रोजन आणि फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करून भारतात ग्रीन हायड्रोजन आधारित इकोसिस्टम स्थापित करण्याच्या उद्देशाने ही कार पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च करण्यात आली होती.

त्यावेळी गडकरी म्हणाले की, ‘आम्ही अनेक प्रयत्न करत आहोत, मात्र प्रदूषण ही मोठी समस्या असल्याने आम्हाला आणखी पावले उचलण्याची गरज आहे. इकोलॉजी आणि पर्यावरण हे खूप महत्वाचे आहे. हवा आणि जलप्रदूषण कमी करण्याची गरज आहे. हे एक मोठे आव्हान आहे, परंतु आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे.’ आता आज दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात फ्लेक्स-फ्युअल कार कारचे अधिकृत लॉन्चिंग करण्यात आले. ही कार पर्यायी इंधनावर चालेल. म्हणजेच ही कार स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करू शकते, त्यानंतर ती ईव्ही मोडवरही चालू शकते.

फ्लेक्स इंधन वाहनांमध्ये (FFVs) देखील एक ICE असते आणि ते 83% पर्यंत गॅसोलीन (पेट्रोल) किंवा गॅसोलीन आणि इथेनॉलच्या मिश्रणावर चालण्यास सक्षम असते. हे इंधन E85 म्हणून ओळखले जाते. त्यात 85 टक्के इथेनॉल इंधन आणि 15 टक्के गॅसोलीन किंवा इतर हायड्रोकार्बन्स असतात. बायो-इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा प्रति लिटर कमी ऊर्जा असते परंतु प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बायो-इथेनॉलचे कॅलरी मूल्य पेट्रोलच्या बरोबरीचे होईल. फ्लेक्स इंधन वाहने ही पेट्रोल किंवा इथेनॉलवर चालण्यास सक्षम असल्याने, भारतीय रस्त्यांवर चालणारे हे 100 टक्के दुहेरी इंधन असलेले पहिले वाहन असेल. (हेही वाचा: Ola S1X EV Scooter: ओलाने लॉन्च केली त्यांची सर्वात स्वस्त स्कूटर; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)

दरम्यान, फ्लेक्स इंधन भारतात सहजपणे तयार केले जाऊ शकते. कारण ऊस, मका यांसारख्या पदार्थांपासून ते तयार केले जाते. या दोन्ही पिकांचे उत्पादन भारतात पुरेशा प्रमाणात होते. ऊस आणि मक्यापासून बनवलेले असल्याने त्याला अल्कोहोल बेस इंधन असेही म्हणतात.