Lockdown: लॉकडाऊन योग्य पद्धतीने नाही हटवला तर समस्या गंभीर- जागतिक आरोग्य संघटना

तर 35 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याची माहिती आहे.

World Health Organization | (Photo credit: archived, edited, symbolic images)

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) महासंचालक (Director General) ट्रेडोस अधनोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी जगभरातील देशांना लॉकडाऊनबाबत इशारा दिला आहे. घेब्रेयसस यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) जर योग्य पद्धतीने हटवला नाही, तर समस्या अधिक गंभीर होऊ शकते. जगभरातील विविध देश लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत आहेत. मात्र, या देशांनी लॉकडाऊन हटविताना योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे, असेही घेब्रेयसस यांनी म्हटले आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआने दिलेल्या वृत्ताचा दाखला देत आयएएनएसने म्हटले आहे की, जिन्हिवा येथे एक ऑनलाईन पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत जागतिक आरोग्य संघटना ट्रेडोस अधनोम घेब्रेयसस यांनी सांगितले की, सर्वच देशांनी कोरोना व्हायरस संक्रमनापासून दूर राहायला हवे. त्यामुळे लॉकडाऊन हटविताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. जर ही काळजी घेतली गेली नाही तर, कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो. तसेच, तो पुन्हा नव्याने परतू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने सहा मापदंडांवर विचार करण्यासाठी सर्व देशांना शिफारस केली आहे. या शिफारशिंमध्ये म्हटले आहे की, कडक तपासणी, आयसोलेशन, चाचण्या करुन उपचार, तपास करुन रुग्णांचा संपर्क शोधणे, कार्यालयं, कामाची ठिकाणं शाळा आदी ठिकाणी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे. तसेच, लॉकडाऊन अगोदर नागरिकांची मानसिकता तयार करणे अशा गोष्टींचा समावेश या शिफारशिंमध्ये आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine: कोरोना व्हायरस वर लस बनवण्यात यशस्वी झाल्याचा इटली मधील शास्त्रज्ञांचा दावा, वाचा सविस्तर)

ट्रेडोस अधनोम घेब्रेयसस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत 2 लाख 50 हजार नागरिकांचा कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. तर 35 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाल्याची माहिती आहे. त्यांनी सांगितले की, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीनंतर कोरोना संक्रमनाची प्रतिदिन सरासरी 80 हजार प्रकरणं पुढे येत आहेत. ट्रेडोस यांनी सांगितले की, ही केवळ संख्या नाही. तर, यात आई-वडील, बहिण भाऊ, पती पत्नी असा कुटुंबच्या कुटुंबांचा समावेश आहे.