Hacktivism Due to Religious Motivations: धार्मिक प्रेरणांमुळे भारत ठरला हॅक्टिव्हिझमचा प्रमुख लक्ष्य; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
अहवालात म्हटले आहे की, हॅक्टिव्हिस्ट गटांनी सर्व प्रदेशांमध्ये समान रणनीती वापरल्या.
सुरक्षा संशोधकांनी जागतिक स्तरावर 2023 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) हॅक्टिव्हिझमच्या (Hacktivism) घटनांमध्ये वाढ नोंदवली आहे. यामध्ये भारत धार्मिक कारणांमुळे हॅक्टिव्हिझमचे प्रमुख लक्ष्य म्हणून उदयास आला आहे. सोमवारी एका नवीन अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. सायबरसेक्युरिटी फर्म CloudSEK च्या मते, 2023 च्या पहिल्या तिमाहीत हॅक्टिव्हिझम लँडस्केपमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, एप्रिलमध्ये हल्ल्यांमध्ये 35 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
'हॅक' आणि 'अॅक्टिव्हिझम' या शब्दांच्या संयोगातून हॅक्टिव्हिझम हा शब्द बनला आहे. म्हणजे धार्मिक, राजकीय किंवा सामाजिक हेतूने हॅकिंग करणे किंवा संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करणे. हॅक्टिव्हिझमची कृती करणाऱ्या व्यक्तीला हॅक्टिव्हिस्ट म्हटले जाते. मे महिन्यात हॅक्टिव्हिझमच्या घटनांच्या सरासरीमध्ये थोडी घट झाली असली तरी जूनमध्येही असाच ट्रेंड दिसून आला.
अहवालात नमूद केले आहे की, 2021 ते 2023 या कालावधीत हॅक्टिव्हिस्ट गटांनी जगभरातील एकूण 67 देशांना लक्ष्य केले. या देशांपैकी, भारताला सर्वात जास्त प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर इस्रायल, पोलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानमध्ये हल्ले केले गेले. संशोधकांनी सांगितले की, ‘भारत, इस्रायल, डेन्मार्क आणि स्वीडन सारखे देश धार्मिक प्रेरणांमुळे हॅक्टिव्हिझमचे प्रमुख लक्ष्य म्हणून उदयास आले, तर पोलंड, युक्रेन, लॅटव्हिया आणि इतरांवर हॅक्टिव्हिझमचे हल्ले प्रामुख्याने राजकीय कारणांमुळे प्रेरित होते.’ (हेही वाचा: यूट्यूब व्हिडिओ लाईक करा, गुगल रिव्ह्यू लिहा आणि पैसे कमवा; 15,000 भारतीयांची 700 कोटींची फसवणूक, जाणून घ्या सविस्तर)
सरकारी क्षेत्राला हॅक्टिव्हिस्ट हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसला, त्यानंतर ना-नफा, शिक्षण, ऑटोमोबाईल, वित्त आणि बँकिंग आणि ऊर्जा-तेल आणि वायू क्षेत्रांचा नंबर लागतो. अहवालात म्हटले आहे की, हॅक्टिव्हिस्ट गटांनी सर्व प्रदेशांमध्ये समान रणनीती वापरल्या. हे मुख्यतः डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ले होते. वित्त आणि बँकिंग क्षेत्रासाठी, डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ल्यांनी त्यांच्या इंटरनेट बँकिंग सेवांना लक्ष्य केले.