सिडनीमध्ये 'पिंक टेस्ट'चे समर्थन करताना, विराट कोहलीचे हे कृत्य पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

पिंक डे टेस्टमध्ये मयंक अग्रवाल आउट झाल्यावर जेव्हा विराट खेळण्यासाठी मैदानावर आला, तेव्हा गुलाबी रंगाचे बॅट स्टिकर, ग्लव्ह्ज आणि बॅट ग्रिप या गोष्टींमुळे त्याने सर्वांना एक सुखद धक्का दिला

विराट कोहली (Photo: BCCI)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने अनेक विक्रम मोडीत काढत जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. विराटच्या धडाकेबाज फलंदाजीने त्याला सेलेब्जच्या यादीत बसवले आहे. यामुळे साहजिकच प्रसिद्धीसोबत एका मोठ्या क्रिकेटपटूवर एक सामाजिक जबाबदारीही येते. विराटदेखील जसे जमेल तसे सामाजिक कार्यांमध्ये आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. याचीच प्रचीती गुरुवारी, सिडनी येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरीजच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचदरम्यान आली. या टेस्ट मॅचला ‘पिंक टेस्ट’ (Pink Test) असेही म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ (Glenn McGrath) ची, ‘ग्लेन मॅकग्राथ फाऊंडेशन’ ही संस्था ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करते. त्यासाठी होम सिजनच्या सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या मॅचमध्ये एक विशेष अभियान राबवले जाते. या अभियानाला विराट कोहलीने आपल्यापरीने, एका वेगळ्या ढंगात समर्थन दिले.

या मॅचदरम्यान लोक गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतात, स्टंपपासून ते स्टेडियममधील अनेक गोष्टी गुलाबी रंगाच्या असतात. मॅचमध्ये खेळणारे खेळाडूही रुमाल अथवा ग्लव्ह्ज किंवा गुलाबी रंगाच्या ग्रिपच्या रूपाने या अभियानाचे समर्थन करतात. याच गोष्टीमध्ये विराटने आपले योगदान दिले आहे. या पिंक डे टेस्टमध्ये मयंक अग्रवाल आउट झाल्यावर जेव्हा विराट खेळण्यासाठी मैदानावर आला, तेव्हा गुलाबी रंगाचे बॅट स्टिकर, ग्लव्ह्ज आणि बॅट ग्रिप या गोष्टींमुळे त्याने सर्वांना एक सुखद धक्का दिला. क्रिकेटविश्वात विराटच्या या कृत्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

एससीजी (Sydney Cricket Ground) मध्ये पहिल्यांना पिंक टेस्ट 2009 मध्ये खेळली गेली होती. ही पिंक टेस्ट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये रंगली होती. त्यानंतर ही प्रथा चालूच राहिली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळली गेलेली ही 11 वी पिंक टेस्ट मॅच आहे. ग्लेन मॅकग्राथची पत्नी जेन मॅकग्राथला कर्करोगाने ग्रासले होते. 2005 मध्ये या दोघांनी या संस्थेची स्थापना केली होती. मात्र 2008 साली जेन मॅकग्राथचे निधन झाले. त्यानंतर 2009 पासून या ‘पिंक टेस्ट’ प्रथेची सुरुवात झाली.