महेंद्रसिंह धोनी निवृत्तीनंतर करणार सैन्याद्वारे देशसेवा? धोनीच्या जवळच्या मित्राकडून खास खुलासा
वर्ल्डकपची सांगता झाल्यानंतर तर त्याला अधिकच उधाण आले आहे.
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा अगदी वर्ल्डकपला सुरुवात होण्यापासूनच रंगत आहेत. वर्ल्डकपची सांगता झाल्यानंतर तर त्याला अधिकच उधाण आले आहे. धोनीने निवृत्त व्हावे आणि होऊ नये, असे सांगणारे दोन गट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र निवृत्तीनंतर नक्की धोनी करणार काय? यावर आता चर्चा होऊ लागली आहे. तर निवृत्तीनंतर सैन्यात आव्हानात्मक पोस्टिंग मिळावी, अशी धोनीची इच्छा आहे. त्याचबरोबर सियाचीन सारख्या ठिकाणी कठीण परिस्थितीत राहून देशसेवा करण्याची धोनीची इच्छा असल्याची माहिती धोनीच्या एका जवळच्या मित्राने एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिली आहे.
तसंच धोनी या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी सैन्याशी संपर्क साधू शकतो, अशी माहिती धोनीच्या जवळच्या मित्राकडून मिळाली आहे. मात्र धोनी निवृत्तीबद्दल काही घोषणा करण्याच्या तयारीत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना धोनीच्या मित्राने सांगितले की, त्याच्या डोक्यात नेमके काय चालू आहे, हे ओळखणे कठीण आहे. (क्रिकेटमधून निवृत्तीनंतर महेंद्र सिंघ धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार? पहा काय म्हणाले जेष्ठ भाजप नेते)
मात्र धोनीच्या मित्राकडून मिळालेली ही खास माहिती कितपत खरी ठरेल, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. (लता मंगेशकर नंतर एम एस धोनी च्या निवृत्तीवर जावेद अख्तर यांनी मांडले आपले मत, म्हणाले "धोनीच्या निवृत्तीची चर्चा कशाला?")
वर्ल्डकपमधील 8 सामन्यात धोनीने 273 धावा केल्या. त्यावेळेसही धोनीच्या संथ खेळीवर अनेक स्तरातून टीका झाली. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची मागणी जोर धरु लागली. तर एकीकडे टीम इंडियाला तुझी गरज असल्याने इतक्यात निवृत्त होऊ नकोस, असा सल्ला अनेक दिग्गजांनी धोनीला दिला आहे.