IPL 2022: आरसीबीच्या प्लेऑफची गुरुकिल्ली मुंबईकडे, रोहितची ‘पलटन’ करणार विराटच्या रॉयल चॅलेंजर्सची नौका पार?
आरसीबी संघाने टेबल-टॉपर्स गुजरात लायन्सवर 8 गडी राखून विजय मिळवून आयपीएल 2022 च्या प्लेऑफची शक्यता वाढवली आहे.
IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएल (IPL) 2022 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव करून प्ले ऑफसाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. मात्र या विजयानंतरही बेंगलोरसाठी प्ले ऑफमध्ये पोहोचणे सोपे नाही कारण त्यांना आता अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने मुंबईवर मात केल्यास बेंगलोर स्पर्धेतून बाहेर पडेल आणि दिल्ली प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के करेल. (IPL 2022 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या प्लेऑफच्या आशा बळकट, IPL 2022 मध्ये पंजाब- सनरायझर्सचे आव्हान संपुष्टात)
दरम्यान, गुजरात टायटन्सवर विजयानंतरही बेंगलोरचा नेट रनरेट अजूनही निगेटिव्ह आहे तर दिल्लीचा सकारात्मक आहे. अशा स्थितीत आरसीबीच्या प्लेऑफची चावी आता मुंबईकडे असून रोहित अँड कंपनी विराटच्या संघाची नौका पार करण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहितच्या संघाला पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. दिल्लीविरुद्ध शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा रोहितच्या संघावर विश्वास असल्याचे तो म्हणाला. डु प्लेसिस म्हणाला, “तुम्हाला नेहमीच मजबूत फिनिश करायचे असते. विराट नेटमध्ये खूप मेहनत घेत होता. मी त्यांना प्रोत्साहन देतो. मला वाटते की आजची रात्र अनेक कारणांसाठी महत्त्वाची होती. आपण नेहमी दृढपणे समाप्त करू इच्छिता. कामगिरीतील सातत्याचा अभाव आम्हाला या स्थितीत आणले. आता मला रोहितकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.”
साखळी टप्प्यातील सर्व 14 सामने खेळून बेंगलोरचे आता 16 गुण झाले असून ते सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्सचे 13 सामन्यांतून 14 गुण आहेत आणि संघ पाचव्या क्रमांकावर बसला आहे. दिल्लीने मुंबईवर मात केल्यास त्यांचे 16 गुण होतील. बेंगलोरचा नेट रनरेट -0.253 आहे आणि दिल्लीचा +0.255 आहे. दोघांचा नेट रनरेट राजस्थान रॉयल्सपेक्षा (+0.304) खराब आहे. या समीकरणानंतर दिल्लीने मुंबईविरुद्ध विजय मिळवताच आरसीबीला घरी परतणे भाग पडणार आहे.