IPL 2022, MI vs DC: अखेर शेवट गोड करताना मुंबईचा 5 विकेट्सने दिमाखदार विजय, दिल्ली कॅपिटल्सचा गाशा गुंडाळला; RCB च्या झोळीत प्लेऑफचे तिकीट

दिल्लीसाठी ‘करो या मरो’च्या सामन्यात रोहित शर्माच्या ‘पलटन’ने 5 विकेट्सने बाजी मारली आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला झाला आहे आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीने 16 पॉईंटसह प्ले ऑफमध्ये दिमाखदार प्रवेश केला.

तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दिल्लीसाठी ‘करो या मरो’च्या सामन्यात रोहित शर्माच्या ‘पलटन’ने बाजी मारली आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. दिल्लीने मुंबईसमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात रोहित ब्रिगेडने 5 विकेट्सने मनोरंजक विजय मिळवला आणि प्लेऑफच्या शर्यतीतून दिल्लीचा पत्ता कट केला. दरम्यान, मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) झाला आहे. फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीने (RCB) 16 पॉईंटसह प्ले ऑफमध्ये दिमाखदार प्रवेश केला. ईशान किशनने 48 धावा तर डेवाल्ड ब्रेविसने 37 धावा केल्या. (IPL 2022 PlayOffs Schedule: प्ले ऑफच्या चार जागेसाठी संघावर शिक्कामोर्तब, जाणून घ्या कोणता संघ कोणाच्या समोर; पाहा PlayOffs चे संपूर्ण वेळापत्रक)

सामन्याबद्दल बोलायचे तर दिल्लीने दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना मुंबईने संथ सुरुवात केली. ईशान किशन एकीकडे मोठे फटके खेळत होता, तर कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीपासून थोडा अस्वस्थ दिसत होता. रोहितने पहिली धाव घेण्यासाठी 10 चेंडूंचा सामना केला. यानंतर किशन आणि ब्रेविसने संयमी फलंदाजी करून दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अर्धशतकाच्या जवळ असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात किशनने आपली विकेट भेट केली. ईशाननंतर काही अंतराने ब्रेविस देखील पॅव्हिलियनमध्ये परतला. अखेरीस टिम डेविड आणि तिलक वर्मा यांनी सूत्रे हाती घेत मुंबईला शेवटच्या लीग सामन्यात विजयीरेष ओलांडून दिली. टिमने 34 धावा तर तिलकने 21 धावा केल्या. एकेकाळी मुंबई हा सामना हरणार असे वाटत होते, पण त्यानंतर टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावांची खेळी केली आणि दिल्लीचा गाशा गुंडाळला. दिल्लीकडून एनरिच नॉर्टजे आणि शार्दूल ठाकूरला 2-2 तर कुलदीप यादवला 1 विकेट मिळाली. अशाप्रकारे दिल्लीच्या पराभवाने बेंगलोर संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचणारा अखेरचा चौथा संघ ठरला आहे. प्ले ऑफमध्ये आरसीबी संघाचा सामना तिसऱ्या क्रमांकावरील लखनऊ सुपर जायंट्सशी एलिमिनेटर सामन्यात होईल.

याशिवाय नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात खराब झाली आणि 50 धावा करेपर्यंत दिल्लीने चार विकेट गमावल्या. रोवमन पॉवेल आणि करुणाधार ऋषभ पंत यांनी पाचव्या विकेटच्या भागीदारीत 75 धावा जोडून संघाला काही प्रमाणात सावरले. पंतने 33 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 39 धावा ठोकल्या, तर पॉवेलने 34 चेंडूत 43 धावा करताना एक चौकार आणि चार षटकार ठोकले. तसेच अक्षर पटेलने 10 चेंडूत दोन षटकारांसह नाबाद 19 धावा करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने 25 धावांत तीन बळी घेतले, तर रमणदीप सिहने 29 धावांत दोन बळी घेतले.