India vs West Indies 5th ODI 2018: भारत एकदिवसीय मालिका खिशात घालणार की वेस्ट इंडिज बरोबरीत सोडवणार ?
तिरूवनंतपूरम येथे १ नोव्हेंबरला पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा चौथ्या एकदिवसीय सामन्यात २२४ धावांनी दारूण पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. सलामीवीर रोहित शर्मा आणि अंबाती रायडूच्या शतकांच्या जोरावर भारताने तब्बल ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याचा सामना करताना वेस्ट इंडीज संघ केवळ १५३ धावात गारद झाला. खलील अहमदच्या भेदक गोलंदाजी समोर इंडीजचे फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. आता विराट सेनेला पाचवा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची सुवर्ण संधी आहे. तर वेस्ट इंडीजला सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. तिरूवनंतपूरम येथे १ नोव्हेंबरला पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. नक्की वाचा: क्रिकेट वर्ल्डकप 2019 साठी संघात कुणाचेही स्थान पक्के नाही : रोहित शर्मा; अंबाती रायुडूच्या शतकी खेळीचेही कौतुक!
भारतीय फलंदाजांनी या मालिकेत जबरदस्त खेळी केली आहे. कर्णधार विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यात शतक ठोकून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. तसेच रोहित शर्माने सुद्धा आपल्या शतकांची मालिका कायम ठेवली आहे. अंबाती रायडू सुद्धा फोर्मात आहे. गोलंदाजीत भारताची भिस्त पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर आहे. खलील अहमद, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्या कडून सुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
वेस्ट इंडीज संघाची भिस्त शाई होप आणि एशले नर्सवर आहे. होपने या मालिकेत खूप चांगली कामगिरी केली असून त्याच्याकडून इंडीज संघाच्या खूप अपेक्षा आहेत. तसेच कर्णधार जेसन होल्डरने मागच्या सामन्यात नाबाद ५४ धावांची खेळी केली होती परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून साथ लाभली नाही. वरच्या क्रमांकावर होल्डर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. अनुभवी मार्लन सॅम्युअल्स कडून सुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. नक्की वाचा: भारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी.
कधी आहे कुठे आहे सामना?
भारत आणि वेस्ट इंडीज मध्ये पाचवा एकदिवसीय सामना तिरूवनंतपूरम येथे १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.
वेस्ट इंडिज संघ: जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियान अॅलीन, सुनील अॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, अॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय, किरॉन पॉवेल.