Fact Check: कोरोना व्हायरस एक बॅक्टेरिया असून तो Aspirin च्या गोळीने बरा होतो; सोशल मिडियावर Fake News व्हायरल, जाणून घ्या सत्य
कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिकल चाचण्याबाहेर अॅस्पिरिन वापरण्याचा उल्लेख केलेला नाही. एस्पिरिन एक कृत्रिम कंपाऊंड आहे जे तीव्र वेदना आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाते
सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून जगाची खबरबात ठेऊ शकता. एकाचवेळी अनेकांशी संपर्क साधण्याचे हे उत्तम मध्यम आहे. आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाशी जोडलेली आहे. परंतु आजकाल सोशल मिडिया माध्यम फेक न्यूजचे (Fake News) केंद्रही बनत चालले आहे. इथे रोज अनेक खोट्या बातम्या पाहायला मिळतात. आता व्हॉट्सअॅपवर अशीच एक बातमी फॉरवर्ड केली जात आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस (Coronavirus) हा एक बॅक्टेरिया (Bacteria) आहे आणि तो अॅस्पिरिनच्या (Aspirin) गोळीने बरा होऊ शकतो.
देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या आहेत. आताही अशीच एक अफवा पसरवली जात आहे की, कोरोना व्हायरस हा एक बॅक्टेरिया आहे. या संदेशात म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या रूग्णाचे शवविच्छेदन केले असता आतमध्ये तो विषाणू नसून बॅक्टेरिया असल्याचे आढळले आहे. हा बॅक्टेरिया रक्ताच्या गुठळ्या बनवतो आणि ऑक्सिजन पुरवठा शरीरात पसरण्यापासून कमी करतो.
परंतु, अशा प्रकारच्या बातम्यांचे ‘पोस्टमॉर्टम’ करणाऱ्या सरकारी वृत्तसंस्थेने, पीआयबी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने सांगितले की, कोविड-19 हा एक व्हायरस आहे बॅक्टेरिया नाही. तसेच ऍस्पिरिनसारख्या गोळ्यांनी तो बरा होऊ शकत नाही. अशा खोट्या मेसेजने लोकांची दिशाभूल करू नये, असेही पीआयबीने सांगितले आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीत ऍस्पिरिन अजिबात वापरू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सरकारी संस्थेने म्हटले आहे.
दरम्यान, अजूनही कोरोना व्हायरसवर विशिष्ट उपचार असल्याचे समोर आलेले नाही. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिकल चाचण्याबाहेर अॅस्पिरिन वापरण्याचा उल्लेख केलेला नाही. एस्पिरिन एक कृत्रिम कंपाऊंड आहे जे तीव्र वेदना आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाते. सध्या फक्त लसीमुळे कोरोनावर काही प्रमाणात मात देता येऊ शकते असे समोर आले आहे.