Aurangabad Lockdown Guidelines: औरंगाबाद शहरात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन, केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्हयात 30 मार्च ते 08 एप्रिल या काळावधीत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
Aurangabad Lockdown Guidelines: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद राहणार आहेत. आरोग्य मंत्रालय भारत सरकार व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनानूसार, कोरोनाग्रस्त रुग्णाच्या इतर लोकांनी संपर्कात येवू नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे, कार्यक्रमाचे आयोजन करणे इ. बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने लोकांच्या एकत्र येण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात वेळोवेळी अंशतः लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्हयात 30 मार्च ते 08 एप्रिल या काळावधीत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. (वाचा - Maharashtra Government Issues New Guidelines: महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर)
दरम्यान, लॉकडाऊन काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्यास्तव औरंगाबाद महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधीत वार्डाचे वार्ड अधिकारी व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधीत अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त लॉकडाऊन पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून यांना संबंधीत पोलीस हवालदार व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी, विविक्षीतपणे नेमलेले अधिकारी, कर्मचारी, ग्राम व नगर विकास विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि महसूल अधिकारी, कर्मचारी या आदेशाची नोंद घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतील. याशिवाय लॉकडाऊन आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस, संघटना किंवा आस्थापना विरुध्द गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
लॉकडाऊनसंदर्भातील आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.