Most Expensive City in India for Expats: मुंबई ठरले स्थलांतरीत लोकांसाठी देशातील सर्वात महागडे शहर; वर्षभरात घरभाड्यात झाली 15-20 टक्के वाढ
अहवालानुसार, हाँगकाँग, सिंगापूर आणि झुरिच या वर्षी आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी जागतिक स्तरावर सर्वात महाग शहरे ठरली आहेत.
गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये (Mumbai) घरभाड्यात विक्रमी वाढ झाली आहे. परिणामी शहरातील इतर खर्चातही वाढ नोंदवली गेली आहे. अशात आता प्रवाशांसाठी किंवा स्थलांतरीत लोकांसाठी मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर (Most Expensive City in India for Expats) ठरले आहे. मर्सरच्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे-2023' (Mercer’s 2023 Cost of Living Survey) नुसार, भारतातील प्रवासींसाठी मुंबई हे सर्वात महाग शहर आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात इथे घरभाड्यात 15-20 टक्क्यांनी झालेली वाढ. अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या भारतीय शहरांमध्ये चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे येथे राहण्याचा खर्च मुंबईच्या 50 टक्क्यांहून कमी आहे.
मुंबईपाठोपाठ नवी दिल्ली आणि बेंगळुरूचा क्रमांक लागतो. मर्सरच्या सर्व्हेनुसार जागतिक स्तरावर पाच खंडांमधील 227 शहरांमध्ये मुंबई 147 व्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर या यादीत हाँगकाँग आघाडीवर आहे. जागतिक क्रमवारीत दिल्ली 169व्या, चेन्नई 184व्या, बेंगळुरू 189व्या, हैदराबाद 202व्या, कोलकाता 211व्या आणि पुणे 213व्या क्रमांकावर आहे.
मर्सरच्या सर्वेक्षणात प्रत्येक शहरातील 200 पेक्षा जास्त वस्तू आणि सेवांच्या किमतींची तुलना केली जाते, ज्यात घर, वाहतूक, अन्न, कपडे, घरगुती वस्तू आणि मनोरंजन यांचा समावेश आहे. अहवालानुसार, हाँगकाँग, सिंगापूर आणि झुरिच या वर्षी आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी जागतिक स्तरावर सर्वात महाग शहरे ठरली आहेत. रँकिंगमध्ये सर्वात कमी महागड्या शहरांमध्ये हवानाचा समावेश होतो. यासह पाकिस्तानमधील कराची आणि इस्लामाबाद ही आणखी दोन स्वस्त शहरे आहेत. 2023 मध्ये परदेशी नागरिकांसाठी आशियातील 35 सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश आहे. (हेही वाचा: Mumbai Water Price: मुंबईत 16 जूनपासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता, दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे)
जाणून घ्या मुंबईमध्ये घरांचे भाडे का वाढले-
महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी सांगितले की, एमएमआरमध्ये सुमारे 10,000 इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सरकारने दिलेल्या सवलतींमुळे अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. काही रखडलेले प्रकल्पही सुरू झाले आहेत. या इमारतींमधील रहिवासी नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. अशाप्रकारे भाडेकरूंची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे घरभाडे वाढणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे कोरोनानंतर घरून काम संपल्यामुळे मुंबईत परतलेल्या नोकरदार व्यावसायिकांच्या घरांच्या मागणीमुळेही भाडे वाढले आहे.