मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाना शंकरसेठ टर्मिनस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने संमत
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा निणर्य घेत, औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Airport) असे केले
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मोठा निणर्य घेत, औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Airport) असे केले. आता महाराष्ट्र विधानसभेत मुंबई सेंट्रल स्टेशनचे (Mumbai Central station), नाना शंकरसेठ टर्मिनस (Nana Shankarsheth Railway Station) असे नामकरण करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी मान्यता दिली आहे. आधुनिक मुंबईचे शिल्पकार अशी नाना शंकरशेठ यांची ओळख. मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
शिवसेनेकडून (Shivsena) मुंबई सेंट्रल स्टेशनचे, नाना शंकरसेठ टर्मिनस करावे अशी मागणी गेली अनेक वर्षे जोर धरत होती. 2017 मध्ये, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही ही मागणी केली होती. आता हा निर्णय एकमताने संमत झाला आहे. मुंबईकरांसाठी ही एक मोठी बातमी ठरत आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच याचे प्रत्यक्ष नामांतर होईल. सावंत यांनी मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त चर्नी रोड स्थानकाचे नाव गिरगाव, एलफिन्स्टन रोडचे प्रभादेवी, करी रोडचे लालबाग आणि सँडहर्स्ट रोडचे डोंगरी असे नामकरण करण्याची मागणी केली होती.
मात्र सरकारच्या या निर्णयाला रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वे वरील महत्वाचे टर्मिनस असल्यामुळे, या टर्मिनसला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी मागील 15 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाने केली होती. मात्र आता सरकारने मुंबई सेन्ट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याने आठवले यांनी सरकारवर टीका केली आहे. (हेही वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय; औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ' असे नामांतर; सीएम उद्धव ठाकरे यांची घोषणा)
दरम्यान, जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1800 मध्ये मुंबई येथे झाला. ते मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो. मुंबई-ठाणे रेल्वे सुरु करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. एक उद्योगपती म्हणून मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्याचा पाया त्यांनीच उभारला. आपल्या संपत्तीचा विनियोग योग्य ठिकाणी व्हावा म्हणून त्यांनी मुंबईच्या जडणघडणीसाठी अनेक देणग्या दिल्या.