Lok Sabha Election 2024 Results: मुंबईमधील 6 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात, तर अजित पवार गटाला रायगडमधून सुनील तटकरेंद्वारे एक जागा मिळवण्यात यश

या ठिकाणी शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभे केले होते. मुंबई उत्तर पूर्व इथे उद्धव ठाकरे गटाचे संजय पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये लढत आहे. यामध्ये संजय पाटील आघाडीवर आहेत.

Nana Patole, Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

Lok Sabha Election 2024 Result: अधिकृतरीत्या महाराष्ट्रातील दोन जागांवरील मतमोजणी पूर्ण झाली असून, या दोन जागांवरील उमेदवारांची नवे समोर आली आहेत. यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे. दुसरीकडे, मुंबई दक्षिण मध्य ठिकाणी अनिल देसाई हे शिवसेनेकडून (यूबीटी) निवडणूक लढवत होते. देसाई यांनी एकनाथ शिंदे गटाच्या विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे.

महाविकास आघाडीने मुंबईमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत 6 पैकी 5 जागा जवळजवळ जिंकल्या आहेत. मुंबईच्या इतर जागांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई दक्षिण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अरविंद सावंत मोठ्या आघाडीवर आहेत. शिंदे गटाने इथे यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती.

मुंबई उत्तर पश्चिम जागेवर उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आघाडीवर आहेत. या ठिकाणी शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उभे केले होते. मुंबई उत्तर पूर्व इथे उद्धव ठाकरे गटाचे संजय पाटील आणि भाजपचे मिहीर कोटेचा यांच्यामध्ये लढत आहे. यामध्ये संजय पाटील आघाडीवर आहेत. यंदा मुंबई उत्तर मध्य जागेवर अनेकांचे लक्ष लागून होते. इथे कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड व भाजपचे उज्वल निकम एकमेकांसमोर होते. मात्र अखेर वर्षा गायकवाड यांनी निकम यांना मात दिली आहे. गायकवाड या जागेवरून निवडणून आल्या आहेत. (हेही वाचा: Indian General Election Results 2024: 'बच्चा अभी बडा हो गया'; रोहित पवार यांचा विरोधकांना टोला)

सध्या मुंबईमधील फक्त एक जागा- मुंबई उत्तर ही महायुतीला मिळाली आहे, जिथे भाजपकडून पियुष गोयल उभे होते. कॉंग्रेसने इथे भूषण पाटील यांना उमेदवारी दिली होती. सध्याचे ट्रेंड्स पहिले तर, महाराष्ट्रात ठाकरे गट 10 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली आहे. कॉंग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 11 जागांवर, शरद पवार गट 7 जागांवर तर शिंदे गट 6 जागांवर आघाडीवर आहे.