Father Francis Dibrito Passes Away: ज्येष्ठ लेखक, पर्यावरणवादी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन
ते 82 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून ते प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्रस्त होते.
मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ साहित्यिक, परिवर्तीणवादी चळवळीचे कार्यकर्ते लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून ते प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. आज (गुरुवार, 25 जुलै) पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. मराठी साहित्यविश्वात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मोलाची भर घातली. धाराशीव (जुने उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता त्यांचे पार्थिव नंदाखाल येथील होली स्पिरिट चर्च येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी मिस्सा आज म्हणजे 25 जुलै 2024 सायंकाळी 6 वाजण्याच्या सूमारास होली स्पिरिट चर्च येथे पार पडणार आहे. (हेही वाचा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीनंतर साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांना फोनवरुन धमक्या)
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्यसंपदा
- आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
- ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ - दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर 'इन सर्च ऑफ दि
- ओॲसिस'; अनुवादक - फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)
- ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)
- ख्रिस्ती सण आणि उत्सव
- तेजाची पाऊले (ललित)
- नाही मी एकला (आत्मकथन)
- संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास
- सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)
- सृजनाचा मळा
- सृजनाचा मोहोर
- परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)
- मुलांचे बायबल (चरित्र)
नंदखाल येथील संत जोसफ मराठी हायस्कुलमध्ये शिक्षण झालेल्या प्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. पुढे त्यांनी समाजशास्त्र विषयात बीए आणि धर्मशास्त्र विषयात एम. ए. केले. दोन्ही पदव्या त्यांनी सावित्रिबाई फुले विद्यापीठ पुणे येथून घेतल्या. ते ख्रिस्ती धर्मगुरु होते. पण त्याहूनही त्यांची ओळख परिवर्तनशिल चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक आणि पर्यावरणप्रेमी अशीच अधिक हती. खास करुन, पालघर जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. त्यासाठी अनेक विषय मांडले. ते 'सुवार्ता' नावाचे मासिकही चालवत असत. विशेष म्हणजे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मी नव्हे तर मराठी वाचक आणि साहित्यातही लोकप्रिय होते. 1983 ते 2007 या काळात त्यांनी या मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले.