महाराष्ट्रातील एक अजेय किल्ला जंजिरा; पहा कसे पोहोचाल आणि काय पाहाल

अवशेषांचे थडगे, आठवणींच्या झळा, दर्यामध्ये रचला दगड, नामे 'जंजिरा'

लाटांनी वेढला, वाऱ्याने झोडपला, लेवून विजयाचा गंध भाळी, गड मानाने लढला

अभेद्य तुझा दरारा, परतीचा दरवाजा नसावा, कलाल घेऊन खांद्यावर, भगवा मानाने फडकला

हळू हळू इतिहासाची पाने उलटत जातात, कल्पनांचे थवे इथल्या दगडांना स्पर्शून मूर्त रूप घेतात. सगळा काळ डोळ्यासमोरून सरकत जातो, आठवणींचे उमाळे फुटतात. कर्तुत्वाचे पोवाडे गायले जातात. आदेशांचे सूर आजही इथे घुमत असतात. कुठलेतरी कोपरे खलाबतांच्या आणाभाका घेत असतात. तोफांच्या नजरा चौफेर विखुरत असतात. मातीतल्या प्रत्येक कणांत इथे घडलेल्या कहाण्या वसत असतात आणि हेच किल्ले या सर्वांचे एकमेव साक्षीदार असतात.

इतिहास

महाराष्ट्राला जवळजवळ तब्बल ३५० किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. त्यापैकी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजेय किल्ला म्हणून जंजिऱ्याकडे पहिले जाईल. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन जंजिरा शब्द आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. राजापुर खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे. जंजिरा स्वतंत्र कोळी राजाच्या सत्तेखाली होता. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. तिथेच जंजिऱ्याचा पहिला दगड रोविला गेला. १४८५ मध्ये जुन्नरच्या मलिक अहमदने जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोळ्यांचा नेता होता रामभाऊ कोळी. अभेद्य किल्ला आणि रामभाऊचा पराक्रम ह्या पुढे मलिकने हात टेकले. नंतर पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि राम पाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. १५७१ पर्यंत झाले आणि हा दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.

शिवाजी महाराजांचाही प्रयत्न फसला

इ.स. १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. अशा प्रकारे तीन प्रयत्न करूनही शिवरायांना जंजिरा जिंकता आला नाही.

थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता. किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला त्यांनी उभारला, पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

गडाची उंच व मजबून बांधणी, खळाळणाऱ्या लाटांचे संरक्षण, किल्ल्यात सहजासहजी कोणी प्रवेश करू नये म्हणून योजलेले अनेक अचंबे, गडाच्या पाठीशी कलाल बांगडीच्या नेतृत्वाखाली सदैव तत्पर असणाऱ्या ५१४ तोफा यांमुळे हा किल्ला शेवटपर्यंत अजेयच राहिला. २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी जंजिरा भारतीय संघराज्यात विलीन झाला.

काय पहाल

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडेही एक दरवाजा आहे. तब्बल एकोणीस बुलंद बुरूज जंजिऱ्याच्या आजूबाजूला आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.

जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो.

कसे पोहोचाल

जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी रोड, रेल्वे आणि विमान अशा तीनही सेवा उपलब्ध आहेत.

मुंबईवरून मुरुड मार्गे केवळ पाच तासांमध्ये तुम्ही पोहचता. तर पुण्यावरून खोपोली मार्गे साधारण साडेचार तास लागतात

जंजिरासाठीचे जवळचे रेल्वे स्टेशन आहे रोहा तर जवळचे विमानतळ आहे मुंबई

उत्तम काळ

जंजिरा किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा होय

किल्ल्याच्या आसपास राहण्यासाठी अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत, तसेच घरगुती स्वरूपाच्या ठिकाणांचीही सोय किल्ल्याच्या आजूबाजूला होऊ शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now