Datta Jayanti 2018 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, माहूरगड कशी आणि कुठे आहेत?

महाराष्ट्र, कर्नाटक भागात प्रामुख्याने उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाणारी ठिकाणं पहा कोणकोणती आहेत ?

दत्त जयंती 2018 (Photo credits: File Image)

Dattatreya Jayanti 2018 : दत्त हे ब्रह्मा, विष्णु, महेश या तीन देवतांचं एकत्र रूप आहे. महाराष्ट्रामध्ये दत्त जयंती (Datta Jayanti) ही मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंतीचा (Datta Jayanti) उत्सव साजरा केला जाते. मात्र दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासून महाराष्ट्रभरातील दत्तक्षेत्र ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात भाविक साजरा करतात. महाराष्ट्र, कर्नाटक भागात प्रामुख्याने उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाणारी ठिकाणं पहा कोणकोणती आहेत ? Datta Jayanti 2018 : दत्त जयंती का साजरी केली जाते? यंदा दत्त जयंती साजरी करण्याचा मुहूर्त, वेळ आणि विधी काय ?

# माहूरगड

माहूरगड महाराष्ट्रातील नांदेड भागात आहे. माहूरगड हे दत्ताचं जन्मस्थान समजलं जातं. अनुसयेच्या सत्व परीक्षेसाठी ब्रह्मा, विष्णू , महेश आले होते. संतुष्ट होऊन त्यांनी अनुसया आणि अत्री ऋषी यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणी दत्ताच्या मंदिरासोबतच अनुसया आणि अत्री ऋषीचं मंदीर पहायला मिळतं.

कसे पोहचाल ?

माहुरगडाला भेट देण्यासाठी मुंबई- पुण्याहून खास बससेवा आहे. तर रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी नांदेड हे रेल्वे स्थानक सोयिस्कर आहे. येथे भक्तनिवासामध्ये राहण्याची सोय उपलब्ध आहे.

# नरसोबाची वाडी

 

View this post on Instagram

 

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा #shreeswamisamarth #akkalkot #swamiho #gajananmaharaj #mumbai #dadarmath #pune #thane #narsobachiwadi

A post shared by श्री स्वामी समर्थ (@shri_swami_samartha) on

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ओळख असलेल्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणून विशेष ओळख आहे. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर हे तीर्थस्थळ वसलेलं आहे. प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निर्माण केलेली "वेदभवन" ही वास्तू पाहण्याजोगी आहे.

कसे पोहचाल ?

कोल्हापूर पासून ५० कि. मी. आणि सांगलीपासून २२ किमी अंतरावर नरसोबाची वाडी आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी बससेवा, रेल्वेसेवा आहे. भक्तिनिवास आणि दुपारी बारा वाजेपर्यंत भक्तांना महाप्रसादाची सोय करून दिली जाते.

# गाणगापूर

गाणगापूर या दत्तक्षेत्राच्या ठिकाणी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांनी सुमारे 23 वर्ष वास्तव्य केलं आहे. गाणगापुरही नरसोबाच्या वाडीप्रमाणे अत्यंत रमणीय आहे. भीमा आणि अमरजा या दोन नद्यांच्या संगमावर गाणगापूर हे शक्तीपीठ वसले आहे. संगमावरून दत्तक्षेत्राच्या ठिकाणी जाताना प्राचीन औदुंबराचे एका झाड आहे. अनेक भाविक या औंदुबराच्या वृक्षाखाली 'गुरुचरित्र' या ग्रंथाचे पारायण करतात.

कसे पोहचाल ?

कर्नाटक राज्यातील कालबुर्गी येथे गाणगापूर दत्तक्षेत्र आहे. मुंबई-बंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन भाविकांना या दत्तक्षेत्री जाण्यासाठी फायदेशीर आहे. स्टेशनपासून गाणगापूर 20 किमी दूर आहे. सोलापूर-गाणगापूर अशी थेट बस सेवा आहे. अन्नछत्र, धर्मशाळा येथे भाविकांची उत्तम सोय केली जाते.

# औदुंबर

महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आणि पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरामध्ये औदुंबर वृक्षाची घनदाट छाया

आहे. औदुंबर ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला. या ठिकाणी औंदुबर वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणार्‍या भक्ताला त्याने केलेल्या पूजेचे, पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्या भक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन त्यांनी दिले होते.

कसे पोहचाल ?

औदुंबर या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून खास बस सेवा आहे. . रेल्वेमार्गांनी प्रवास करणार्‍या भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावरील भिलवडी स्टेशन फायदेशीर आहे. स्टेशनवरून सुमारे7 किमी अंतरावर हे दत्तक्षेत्र आहे.

# कुरवपूर

कुरवपूर हे आंध्रप्रदेशातील दत्तक्षेत्र आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा प्रसिद्ध आणि मंत्रमुग्ध करणार्‍या मंत्राचा उगम कुरवपूर या दत्तक्षेत्र ठिकाणी झाला. या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा पहिला अवतार असं समजलं जात. येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादूकांचेही दर्शन घेता येते.

कसे पोहचाल ?

आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून 27 किमी अंतरावर कुरवपूर हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार, 'श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार तर 'स्वामी समर्थ  हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची 'नेमिनाथ' म्हणून तर मुसलमान 'फकिर' म्हणून पूजा करतात.