Pfizer COVID-19 Vaccine: फायझरची कोरोना व्हायरस लस 95 टक्के प्रभावी; आपत्कालीन मंजुरीसाठी तयार

आता यामध्ये फार्मा कंपनी फायझर इंकचे (Pfizer Inc) निकाल अतिशय उत्साहवर्धक आणि सकारात्मक असल्याचे समोर आले आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्राणघातक साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी सध्या अनेक फार्मा कंपन्या लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता यामध्ये फार्मा कंपनी फायझर इंकचे (Pfizer Inc) निकाल अतिशय उत्साहवर्धक आणि सकारात्मक असल्याचे समोर आले आहे. कंपनीने सांगितले की, त्यांनी उत्पादित केलेली लस ही 95% प्रभावी ठरली आहे. यासह, कंपनी अमेरिकेत एफडीएच्या मंजुरीसाठी काही दिवसांत तयार होईल. फायजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोउरला म्हणाले की, ‘गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या साथीच्या आजाराच्या समाप्तीच्या प्रयत्नांसाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण पाऊल आहे.’

फायझरचे सकारात्मक निकाल व तसेच यामुळे कोणतेही दुष्परिणाम समोर न आल्याने, कोरोना विषाणूचा संसर्ग निर्मूलनास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हे यश Pfizer ची mRNA आधारित लस BNT162b2 च्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम विश्लेषणात नोंदविण्यात आले आहे. ही अमेरिकन कंपनी आणि भागीदार BioNTech SE यांनी सांगितले की, त्यांच्या लसीमुळे सर्व वयोगटातील आणि सर्व प्रकारच्या लोकांना संरक्षण मिळाले आहे. याव्यतिरिक्त, आपत्कालीन उपयोग परवाना (EUA) मिळविण्यासाठी या लसीने यूएस एफडीएनचे मानक पूर्ण केले आहे.

या लसची चाचणी 44 हजार लोकांवर केली होती. आकडेवारीत असे आढळले आहे की, 170 स्वयंसेवकांना कोरोना व्हायरस झाला, त्यापैकी 8 लोक असे होते ज्यांना लस देण्यात आली आणि 162 जणांना प्लसीबो देण्यात आला. लसीमुळे या आजाराची तीव्रता कमी झाली तर प्लसीबो ग्रुपमधील 10 पैकी 9 लोकांना गंभीर आजार झाला. या आकडेवारीनुसार 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांवर ही लस 94% पेक्षा जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. (हेही वाचा: कोविड 19 वरील लस कधी येणार? जाणून घ्या अमेरिकेच्या Pfizer Inc आणि BioNTech SE कंपनीच्या लसीबद्दल खास गोष्टी!)

दरम्यान, या लसीचे परिणाम जरी सकारात्मक आढळले असले तरी, भारतासमोर ही लस साठवायची कशी ही समस्या आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्लीचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे की, फायझरची लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागेल जे भारतासारख्या देशांसाठी एक आव्हान आहे. ही लस -70 डिग्री सेल्सियस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे.