Mumbai Post-Diwali Pollution: दिवाळीनंतरच्या प्रदूषणामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसन समस्यासंबंधी रुग्णांमध्ये वाढ- Reports

डॉक्टरांनी सांगितले की तरुण, निरोगी असलेल्या प्रौढांवरही याचा परिणाम होत आहे.

Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

दिवाळीच्या (Diwali 2024) काळात आणि आता दिवाळीनंतर देशाची राजधानी दिल्लीपाठोपाठ मुंबईतील (Mumbai) हवाही प्रदूषणामुळे विषारी बनली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच मुंबईतील अनेक भाग धुक्याने व्यापले आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) खराब श्रेणीत पोहोचला आहे. दिवाळी साजरी झाल्यानंतर, मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. यातील अनेक रुग्ण आयसीयुमध्येही दाखल होत आहेत. वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित फटाके फोडणे यामुळे हवामानात होणारा बदल आणि खराब होणारे वायू प्रदूषण या दोन्ही गोष्टी यासाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर मानतात.

डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील मेहता, यांनी नमूद केले की, दिवाळीनंतर श्वसनसंबंधित समस्यांमुळे हॉस्पिटलला भेट देणाऱ्या रुग्णांमध्ये जवळपास 50% वाढ होते. ते पुढे म्हणाले, ‘विशेषत: धूर, कण आणि वातावरणात सोडल्या जाणाऱ्या हानिकारक रसायनांच्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे दिवाळीचा संबंध अनेकदा श्वसनाच्या आजारांमध्ये वाढण्याशी असतो. मागील काही वर्षांतील ट्रेंड दिवाळीनंतर वायू प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ दर्शवतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांच्या स्थितीत वाढ होत आहे.'

या काळात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या व्यक्ती सर्वात असुरक्षित आहेत. डॉक्टरांनी सांगितले की तरुण, निरोगी असलेल्या प्रौढांवरही याचा परिणाम होत आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ प्रतित समधानी म्हणाले, ‘आम्हाला न्यूमोनियाची गंभीर प्रकरणे दिसत आहेत, यामध्ये काही विषाणूजन्य, तर काही बॅक्टेरियासंबंधित. यांचे निराकरण होण्यास जास्त वेळ लागत आहे. हवामान आणि वायू प्रदूषण हे यासाठी कारणीभूत असणारे प्रमुख घटक आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे हवेतील कणांचे प्रमाण वाढते, त्यामुळे प्रदूषण वाढते. आता दिवाळी संपली आहे, त्यामुळे आम्हाला अशी आणखी प्रकरणे दिसू शकतात.’ (हेही वाचा: World's Most Polluted City: राजधानी दिल्ली बनले जगातील सर्वात प्रदूषित शहर; दिवाळीत झाली मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी)

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिनचे संचालक, डॉ सलील बेंद्रे यांनी योगासनाशी निगडीत दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा सल्ला दिला, जसे की प्राणायाम. ते म्हणाले की, श्वासोच्छवासाच्या स्नायूंना बळकट करणे आणि फुफ्फुसाची क्षमता वाढवणे हे आपल्या फुफ्फुसांना प्रदूषकांशी अधिक चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत करते.