भारतातील अर्धी लोकसंख्या Physically Unfit; शारीरिक हालचालींची मोठ्या प्रमाणावर कमतरता, Lancet च्या अहवालात खुलासा
डब्ल्यूएचओ म्हणते की, जर शारीरिक हालचाली केल्या नाहीत तर शरीराला हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, तसेच मधुमेह टाइप 2, स्मृतिभ्रंश आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका असू शकतो.
कोरोना महामारीनंतर भारतीय लोक फिटनेसबाबत (Fitness) थोडे जागरूक झाले. अनेकांनी जिम सुरु केली, डाएट फॉलो करायला सुरुवात केली. मात्र आता लॅन्सेटच्या (Lancet) अलीकडील अभ्यासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अहवालानुसार, भारतीय लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोक शारीरिकदृष्ट्या अनफिट आहेत. लेसेंटच्या या अभ्यासात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहण्याच्या बाबतीत भारताची लोकसंख्या जगात 12 व्या क्रमांकावर आहे.
अहवालामध्ये म्हटले आहे की, हे चित्र असेच राहिले तर भारतीय लोकसंख्येपैकी साठ टक्क्यांहून अधिक लोक शारीरिक हालचालींच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांना बळी पडतील. ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्धारित केलेल्या पुरेशा शारीरिक हालचालींच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यास सक्षम नाही.
पुरुषांमध्ये शारीरिक हालचालींची टक्केवारी 42 टक्के आहे, तर महिलांमध्ये ही टक्केवारी 57 टक्के आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, भारतीय महिला पुरुषांच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहू शकत नाहीत. 2000 मध्ये देशात अपुरी शारीरिक हालचाल टक्केवारी 22.3 होती, तर 2022 मध्ये ती 49 टक्क्यांहून अधिक झाली आहे. हे स्पष्ट संकेत आहे की, 2030 पर्यंत भारतातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या शारीरिकदृष्ट्या अनफिट होईल.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, निरोगी राहण्यासाठी दररोज शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निरोगी राहण्यासाठी दर आठवड्याला 150 ते 300 मिनिटे शारीरिक हालचाली करण्याची शिफारस केली आहे. जर कोणी 150 मिनिटे मध्यम हालचाल करत नसेल तर त्याला 70 मिनिटांची तीव्र हालचाल करावी लागेल. याचा अर्थ, एकंदरीत, चांगल्या आरोग्यासाठी दररोज शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Effective Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी प्रभावी टीप्स)
डब्ल्यूएचओ म्हणते की, जर शारीरिक हालचाली केल्या नाहीत तर शरीराला हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, तसेच मधुमेह टाइप 2, स्मृतिभ्रंश आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका असू शकतो. शारीरिक हालचालींच्या या अभ्यासासाठी लॅन्सेटने 195 देशांचा अभ्यास केला.