Parkinson's Disease: कोरोना संसर्गामुळे वाढू शकतो पार्किन्सन आजाराचा धोका; संशोधनात करण्यात आला दावा
यात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना विषाणू उंदरांच्या मेंदूच्या चेतापेशींना विषारी पदार्थासाठी संवेदनशील बनवतो.
Parkinson's Disease: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचे बाधित व्यक्तीवर किती दुष्परिणाम होतील यावर जगभरात संशोधन सुरू आहे. अशाच एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोना महामारीसाठी जबाबदार असलेला SARS-CoV-2 विषाणू पार्किन्सन्सच्या आजाराच्या (Parkinson's Disease) वाढीस कारणीभूत ठरू शकतो. पार्किन्सन्स हा न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आहे. ज्यामध्ये व्यक्तीचे शरीर थरथर कापू लागते आणि तो चालण्यात संतुलन राखू शकत नाही. संशोधकांच्या मते, याविषयी अधिक माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आतापासून या आजारापासून बचावासाठी योग्य तयारी करू शकू.
पार्किन्सन्स रोगामध्ये कोरोना महामारीसाठी जबाबदार असलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या भूमिकेवरील संशोधन जर्नल मूव्हमेंट डिसऑर्डरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना विषाणू उंदरांच्या मेंदूच्या चेतापेशींना विषारी पदार्थासाठी संवेदनशील बनवतो. जे पार्किन्सन रोगासाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. त्यामुळे मेंदूच्या पेशी खराब होतात. (हेही वाचा - Monkeypox Virus Spread: ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा कम्यूनिटी स्प्रेड सुरू; सरकार हाय अलर्टवर)
तज्ज्ञांच्या मते, जगभरातील दोन टक्के लोक पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त आहेत. वयाच्या 55 व्या वर्षी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कोरोना विषाणूचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात या आजाराला तोंड देण्यासाठी दूरगामी तयारी आधीच करता येईल. संशोधकांच्या मते, कोरोना विषाणूच्या दुष्परिणामांबद्दलचा हा नवीन निष्कर्ष पूर्वीच्या पुराव्यांवर आधारित आहे. ज्यात दावा केला होता की, हा विषाणू मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्सला नुकसान पोहोचवतो.
दरम्यान, सन 2009 मध्ये, या प्रकारच्या इन्फ्लूएंझा महामारीने जगभरातील अनेक देशांना वेढले होते. यानंतर या आजारावर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, इन्फ्लूएंझा महामारीच्या उद्रेकामागे N1N1 नावाचा विषाणू आहे. संशोधनासाठी जेव्हा या उंदरांना विषाणूची लागण करण्यात आली. तेव्हा पार्किन्सनच्या लक्षणांना कारणीभूत असलेल्या MPTP नावाच्या विषासाठी अधिक असुरक्षित बनले. यानंतर या विषाणूच्या मानवांवर केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, इन्फ्लूएंझा झाल्यानंतर 10 वर्षांनी पार्किन्सन्सचा धोका दुप्पट होतो.