Chikungunya Cases Increase in Maharashtra: महाराष्ट्रात चिकुनगुनिया प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ; खालावलेली आरोग्यसेवा आणि आर्थिक घटक कारणीभूत?

या आजारामुळे आरोग्य आणि आर्थिक ओझे वाढत असल्याचा इशारा तज्ज्ञ देतात.

Mosquito | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Chikungunya Cases In Maharashtra: महाराष्ट्रासाठी 2024 हे वर्ष अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षात या राज्यात निवडणुका घडल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, अशा काही प्रमुख घटना घडल्या. असे असले तरी याच वर्षात आरोग्याच्या दृष्टीनेही चिंताजनक बाब महत्त्वाची ठरली आहे. ज्यामध्ये चिकनगुनिया रुग्णांमध्ये या वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपैकी (Mosquito-borne Diseases) एक, चिकनगुनिया रुग्णांमध्ये 2023 मधील 1,702 रुग्णांच्या तुलने चिकनगुनिया रुग्णसंख्या यावर्षी 5,445 पर्यंत वाढली आहे. मृत्यूदराच्या बाबतीत हा आजार फारसा धोकादायक नाही. असे असले तरी, सामान्य नागरिकांसाठी हा आजार आर्थिकदृष्ट्या दूरगामी परिणाम (Chikungunya Economic Impact) करतो, असे तज्ज्ञ सांगतात.

वाढती प्रकरणे आणि गंभीर लक्षणे

चिकनगुनिया या डासांमुळे होणाऱ्या विषाणूजन्य रोगामुळे राज्यभरातील रुग्णांमध्ये तीव्र सांधेदुखी, ताप आणि थकवा निर्माण झाला आहे. मेंदू आणि हृदयाच्या ऊतींमध्ये सूज यासारख्या गुंतागुंतीमुळे आयसीयू सेवेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची काही प्रकरणे मुंबईत नोंदवली गेली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एकट्या नागपूर शहरात या आजाराचे 1,077 रुग्ण आहेत, जे राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळजवळ एक पंचमांश इतके आहेत. बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. गौतम भन्साळी यांनी टीओआयशी बोलताना, चिकनगुनियाच्या वाढीचे वर्णन अभूतपूर्व असे केले. ते म्हणाले, "प्रथमच, आम्ही रुग्णालयांमध्ये चिकनगुनियाची लक्षणीय प्रकरणे पाहिली, ज्यात अनेक रुग्ण सतत सांधेदुखी आणि तीव्र तापाने ग्रस्त होते ज्यामुळे हालचाल विस्कळीत होते". (हेही वाचा, Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ; डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुन्याचे 164 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ)

चिकनगुनियाचे आर्थिक परिणाम

बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात चिकनगुनिया मुळे नागरिकांच्या आयुष्यावर होणारा आर्थिक परिणाम प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, रुग्णांना संधिवातासारख्या सांधेदुखी, थकवा आणि नैराश्य यांसारख्या दीर्घकालीन आजारांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांच्या उपचारांवर होणारा खर्च मोठा असतो. अवघ्या 2011 ते 2020 दरम्यान जागतिक स्तरावर या रोगाचा अंदाजे 50 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च झाला. खर्चाची आकडेवारी खालील प्रमाणे:

प्रत्यक्ष खर्चः यूएस $2.8 बिलियन (6%)

अप्रत्यक्ष खर्चः यूएस $47.1 अब्ज (94%) अनुपस्थिती आणि कमी उत्पादकता द्वारे चालविलेले

प्रति प्रकरण सरासरी खर्चः यू. एस. $2,700

अभ्यासात असेही नमूद केले आहे की चुकीचे निदान आणि अपुऱ्या निदानात्मक पायाभूत सुविधांमुळे रोगाचे खरे ओझे कमी नोंदवले गेले आहे. (हेही वाचा, Dengue Cases In Delhi: कोरोनानंतर आता दिल्लीला डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका, एका आठवड्यात आढळले 13 रुग्ण)

चिकनगुनियाची जगभरातील स्थिती

दरम्यान, महाराष्ट्रात चिकनगुनिया रुग्णांचे प्रमाण वाढण्यास अनियमीत पर्जन्यमान आणि बदलते हवामान असल्याचे अभ्यासक सांगतात. ज्यामुळे डासांच्या प्रजननासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते. तसेच, डासांची पैदास वाढली की, या आजाराचे आणि रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते. शहरीकरण, जागतिकीकरण आणि पर्यावरणीय बदलांमधील जागतिक कलांनी देखील चिकनगुनियाच्या वाढत्या प्रसारास हातभार लावला आहे, जो आता 110 हून अधिक देशांमध्ये सार्वजनिक आरोग्याची चिंता आहे. एका आकडेवारीनुसार, 1952 मध्ये टांझानियामध्ये पहिल्यांदा नोंदवलेल्या चिकनगुनियाने जागतिक स्तरावर अंदाजे 18.7 दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे, ज्यात 42% दीर्घकालीन लक्षणे विकसित झाली आहेत. एकट्या महाराष्ट्रात, 2023 मधील 224 च्या तुलनेत 2024 मध्ये मुंबईत 696 प्रकरणे नोंदवली गेली, जी अभूतपूर्व वाढ दर्शवते.