Avian Influenza: देशातील चार राज्यांमध्ये H5N1 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला; केंद्रांने राज्यांना दिल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याच्या सूचना

केंद्र सरकार यासाठी अलर्ट मोडवर असून, केंद्र सरकारने राज्य सरकारला सतर्क केले आहे. पक्षी आणि कोंबड्यांच्या असाधारण मृत्यूबाबत सतर्क राहून, त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला त्वरित कळवा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Bird Flu H5N1 (File Image)

केंद्राने शुक्रवारी सर्व राज्यांना एव्हियन इन्फ्लूएंझाबाबत (Avian Influenza) सतर्क राहण्यास सांगितले. नवीन H5N1 विषाणूची प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी राज्यांना सर्व आरोग्य कर्मचारी आणि खाजगी डॉक्टरांना एव्हियन इन्फ्लूएंझा आणि बर्ड फ्लूच्या लक्षणांबद्दल माहिती देण्याचा सल्ला दिला. एव्हियन फ्लूला बर्ड फ्लू असेही म्हणतात.

सध्या देशात H5N1 व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार यासाठी अलर्ट मोडवर असून, केंद्र सरकारने राज्य सरकारला सतर्क केले आहे. पक्षी आणि कोंबड्यांच्या असाधारण मृत्यूबाबत सतर्क राहून, त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला त्वरित कळवा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 25 मे रोजी जारी केलेल्या संयुक्त सल्लागारात म्हटले आहे की, सध्या चार राज्ये-आंध्र प्रदेश (नेल्लोर), महाराष्ट्र (नागपूर), केरळ (अलाप्पुझा, कोट्टायम आणि पाथनमथिट्टा) आणि झारखंड (रांची) मध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाचा उद्रेक नोंदवला गेला आहे.

हा संसर्ग अत्यंत धोकादायक असून, मानवांमध्ये पसरण्याची उच्च क्षमता आहे, म्हणून या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी आणि रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.  पक्षी आणि पाळीव कुक्कुटपालन यांच्यातील संपर्क टाळण्यासाठी उपाययोजना अंमलात आणण्यास सांगितले आहे. यासाठी राज्यांनी लोकांना उपायांची माहिती द्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे. शिवाय, त्यांना पुरेशा प्रमाणात अँटीव्हायरल औषधे, पीपीई, मास्क इत्यादी सर्व प्रतिबंधात्मक उपायांसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: AIIMS Research Report: मृत व्यक्तीपासूनही होऊ शकते मूल; एम्सने संशोधनात केला दावा)

दरम्यान, साधारण 2006 पासून भारतातील कुक्कुट पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू सामान्यतः स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळलतो.  हे स्थलांतरित पक्षी कोंबड्यांचा संपर्कात आल्याने त्यांनादेखील हा संसर्ग होतो.