World Blood Donor Day 2020: 'जागतिक रक्तदाता दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या यंदाची Theme आणि रक्तदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी

शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' साजरा होत आहे.

World Blood Donor Day 2020 (PC - File Photo)

World Blood Donor Day 2020: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन' (World Blood Donor Day) साजरा होत आहे.

आजदेखील समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिवस' साजरा करत असते. ए-बी-ओ या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त 'जागतिक रक्तदान दिन' साजरा केला जातो.

रक्तदान केल्याने आपल्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. जे लोक ऐच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे, असे जागतिक रक्तदाता दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे.

जागतिक रक्तदाता दिन 2020 थीम -

यंदा जागतिक रक्तदाता दिनाची थीम 'सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते' (Safe Blood Saves Lives) अशी आहे. तर 'रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा' (Give Blood And Make The World a Healthier place) हे यावर्षीचं स्लोगन आहे.

रक्तदान करण्यासाठी आवश्यक अटी -

कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो. वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो. परंतु, रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलोच्या वर असावे. रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे. नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.