Women's Equality Day 2022: भारताची मान अभिमानाने उचावण्यात 'या' महिलांचा आहे मोलाचा वाटा; महिला समानता दिनामिनित्त जाणून घ्या देशाचे मूल्य वाढवणाऱ्या महिलांविषयी
या महिला क्रीडा जगतापासून ते राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेपासून ते प्रशासकीय सेवा क्षेत्रापर्यंत समान अधिकार घेऊन काम करत आहेत.
Women's Equality Day 2022: जगभरात सध्या महिलांच्या स्थितीत विविध बदल झाले आहेत. मात्र, एक काळ असा होता की, भारतासह अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क आणि सन्मान मिळत नव्हता. स्त्रियांना नेहमीच पुरुषांपेक्षा कनिष्ठ समजले जायचे. आजही असे अनेक देश आहेत जिथे महिलांना समान अधिकार मिळालेले नाहीत. महिला आपल्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत. या आवाजाला पाठिंबा देण्यासाठी दरवर्षी 26 ऑगस्ट हा महिला समता दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात महिला समानता दिनाच्या माध्यमातून महिलांचा सन्मान, त्यांच्या हक्कांबाबत लोकांना जागरूक केले जात आहे.
भारतात अशा अनेक दिग्गज महिला आहेत, ज्या सध्या त्यांच्या क्षेत्रात कौतुकास्पद काम करत आहेत. या महिला क्रीडा जगतापासून ते राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेपासून ते प्रशासकीय सेवा क्षेत्रापर्यंत समान अधिकार घेऊन काम करत आहेत. महिला समानता दिनानिमित्त भारताची मान अभिमानाने उचावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांविषयी जाणून घेऊयात...(हेही वाचा - Women’s Equality Day 2022: महिला समानता दिनानिमित्त, भारतीय महिलांना मिळालेल्या 'या' विशेष अधिकारांबद्दल जाणून घ्या)
द्रौपदी मुर्मू -
भारतातील सर्वोच्च पदावर एका महिलेची निवड करण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्ही बोलत आहोत. द्रौपदी मुर्मू या आजच्या काळात भारतातील महिला समानतेचे सर्वात मोठे उदाहरण मानले जाऊ शकते. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मूचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. तीन मुलांच्या निधनानंतर पती गमावून बसलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही, तर देशसेवेसाठी आपले आयुष्य वेचले. राष्ट्र उभारणीच्या पहिल्या टप्प्यावर काम करत त्या राष्ट्रपतीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन -
भारत सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज देशातील सर्वात शक्तिशाली महिला राजकारण्यांपैकी एक आहेत. सीतारामन यांचे नाव भारतातचं नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात महिलांना काटकसरीचे शिक्षण दिले जाते. या गुणाने स्त्रिया घर चालवतात. सीतारामन या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था सांभाळत आहेत. मोदी सरकारमध्ये पद मिळालेल्या निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत. देशाचे आर्थिक व्यवहार त्या सतत सांभाळत असतात. यापूर्वी त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग -
देशाच्या रक्षणाची जबाबदारी फक्त पुरुषांपुरती मर्यादित नाही. भारताच्या मुलींनी सैन्यात आपला वाटा वाढवून महिला समानतेचे उत्कृष्ट उदाहरण ठेवले आहे. राफेलचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात गेल्या वर्षी समावेश करण्यात आला होता. हे शक्तिशाली लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचे श्रेय शिवांगी सिंगला जाते. याआधी फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह यांनीही मिग-21 चे उड्डाण केले आहे.
आयपीएस संजुक्ता पराशर -
सीमा सुरक्षेच्या जबाबदारीत महिलांचे स्थान अधिक बळकट झाल्याने देशात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दरवर्षी आयपीएसच्या भरतीमध्ये महिलांचा सहभाग असतो. जिल्ह्यात अनेक महिला आयपीएस नोकरी करतात. त्यापैकी एक म्हणजे आयपीएस संजुक्ता पराशर. आसाममध्ये तैनात असलेली ही महिला आयपीएस लेडी सिंघम म्हणून ओळखली जाते. अवघ्या 15 महिन्यांत 16 एन्काउंटर करून त्यांनी पोलिस खात्यात विक्रम केला. संजुक्ता पराशर यांना आसाममधील लोक आयर्न लेडी ऑफ आसाम म्हणूनही ओळखतात.
मीराबाई चानू -
एकेकाळी पुरुषांच्या मानल्या जाणाऱ्या खेळांमध्येही भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर थक्क केले आहे. भारतातील अनेक महिला खेळाडू देशाला गौरव मिळवून देत आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत महिला अॅथलेटिक्सची ताकद दिसून आली. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिलं. त्यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्येही कौतुकास्पद कामगिरी केली. आपल्या कर्तृत्वाने मीराबाई चानू महिला समानतेचे उदाहरण बनल्या आहेत.