Kojagiri Purnima 2020: यंदा 'कोजागरी पौर्णिमा' कधी आहे?; जाणून घ्या शरद पौर्णिमेचे व्रत, शुभमुहूर्त आणि महत्त्व
अश्विन पौर्णिमा (Ashwin Purnima) हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.
Kojagiri Purnima 2020: अश्विन पौर्णिमा हीच 'कोजागरी पौर्णिमा' (Kojagiri Purnima) किंवा शरद पौर्णिमा (Sharad Purnima) म्हणून साजरी केली जाते. अश्विन पौर्णिमा (Ashwin Purnima) हा भारतीय धर्म संस्कृतीतील महत्वाचा दिवस मानला जातो. ही पौर्णिमा शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. या पौर्णिमेला माणिकेथारी म्हणजेच मोती तयार करणारी पौर्णिमा असेही संबोधिले जाते. या पौर्णिमेला श्री हरि विष्णूसमवेत माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. यंदा कोजागरी पौर्णिमा 30 ऑक्टोबर 2020 रोजी आहे. पौराणिक कथेनुसार, या दिवशी माता लक्ष्मी रात्री पृथ्वीवर फिरत असतात. असं म्हटलं जात की, लक्ष्मी माता मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. कोजागरीच्या रात्री चंद्राचा शंभर टक्के भाग प्रकाशित दिसतो. त्यामुळे या पौर्णिमेच्या चंद्राला ‘हार्वेस्ट मून’ असेही म्हणतात.
कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व आणि व्रत -
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या रात्री मंदिरे, घरे, उद्याने, रस्ते इ. ठिकाणी दिवे लावण्याची प्रथा आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांच्या प्रतिमांची पूजा करतात. याशिवाय चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. काही लोक घराच्या छतावर दुध आटवण्याचा कार्यक्रम ठेवतात. या दुधाचा नैवेद्या लक्ष्मीमातेला दाखवला जातो. याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्र-लक्ष्मीची पूजा करून व ब्राह्मण भोजन घालून या व्रताची समाप्ती केली जाते. (हेही वाचा - Eid-e-Milad un Nabi 2020 Mehndi Designs: ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने पाहूयात काही सोप्या आणि सुंदर मेहंदी डिझाईन ( Watch Video ))
या दिवशी बळीराजाची पूजा करावी, असेही वामन पुराणात सांगितले आहे. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही, तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा शुभू मुहूर्त आणि तारीख -
- शरद पूर्णिमा तारीख प्रारंभ - 30 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून सुरू
- शरद पूर्णिमा तारीख समाप्ती - 31 ऑक्टोबरला रात्री 8 वाजून 18 मिनिटांपर्यंत
पौराणिककथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर आदी पदार्थ घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. या दिवशी उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करण्याची प्रथा आहे.