International Tiger Day 2020: जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या 'वाघ' बद्दल काही खास गोष्टी
वाघांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर 29 जुलै हा दिवस International Tiger Day म्हणजेच जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात रशियामधून झाली आहे. सेंट पीटर्सबर्ग टाइगर समीट (Saint Petersburg Tiger Summit)मध्ये 2010 साली हा दिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. दरम्यान या समीट मध्ये 2022 पर्यंत जगभरात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मानस व्यक्त करत त्या ध्येयाच्या दृष्टीने काम सुरू झाले. 20व्या शतकाच्या सुरूवातीपासून वाघांच्या संख्येमध्ये 95% घट पहायला मिळाली.
वाघांच्या जगभरात अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये सायबेरियन वाघ, बंगाल टायगर, इंडोचायनीज वाघ, मलायन वाघ, दक्षिण चीन वाघ आदींचा समावेश आहे. भारतामध्ये प्रामुख्याने बंगाल टायगर आढळतो. भारतासोबतच या प्रजातीचा वाघ बांग्लादेश, भूतान, नेपाळ, चीन, म्यानमार मध्ये आढळतात. भारत सरकारच्या माहितीनुसार, 2019 पर्यंत देशात वाघांची संख्या 2967 होती. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार, 2014 मध्ये भारतातील वाघांचा आकदा 2226 होता. 2018 मध्ये तो वाढून 2967 झाला आहे.
जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या वाघांबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी
- वाघ मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. तर पृथ्वी स्तरावर तो तिसरा मोठा मांसाहारी आहे. सायबेरियन टायगर हा सुमारे 660 पौंड वजनाचा समजला जातो.
- जंगलात मोकळ्या फिरणार्या वाघांपेक्षा बंदी असलेले वाघ अधिक आहेत. जगभरात प्राणीसंग्रहालय, सर्कस तर अमेरिकेमध्ये घरातही वाघ बंदिवान केले जातात.
- वाघ हा सिंहाप्रमाणे कळपात राहत नाही. तो बराच काळ एकटं राहणं पसंत करतो. वाघाच्या हद्दीमध्ये आक्रमण झाल्यास ते प्रचंड आक्रमक होतात.
- वाघांमध्ये पुढच्या पायांच्या तुलनेत मागचे पाय अधिक लांब असतात. त्यामुळे त्यांना लांब झेप घेण्यास मदत होते. एकावेळात 30 फीट लांबीचा टप्पा ते ओलांडू शकतात. तर त्यांच्या शेपटीचा झुपका देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो. तो सुमारे 3 फीट लांब वाढत असल्याने बॅलंस देतो.
- कोणत्याही दोन वाघांच्या अंगावर सारखेच पट्टे नसतात. ते प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात.
- वाघांचं लक्ष्य साधण्याचा सरासरी नेम हा परफेक्ट नाही. साधारण एका लक्ष्याला साधण्यासाठी त्याला 20 प्रयत्न करावे लागतात.
- जंगलात राहणार्या वाघाचं आयुष्यमान 10-15 वर्ष असतं. तर बंदी केलेले वाघ 20 वर्षांपर्यंत जगू शकतात.
- वाघांच्या जीभेवरील लाळेत अॅन्टी सेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेला जीभ लावून ते जखम ठीक करू शकतात.
- पाणवठ्याजवळ वाघ जास्त आढळतात. तर दिवसभरात 18 तास ते झोपू शकतात.
- सायबेरियन टायगर आपण वाचवू शकलो नाही तर पुढील 10 वर्षात ते संपू शकतात.
जगाचा आपण वाघांच्या अस्तित्त्वाशिवाय विचार करू शकत नाही. दरम्यान भारतामध्ये आपण वाघांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मेहनत घेत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीमध्ये आपण त्यामध्ये यशस्वी होत असल्याचेही समोर आले आहे.