Ganeshotsav 2019: पुण्यातील मानाचे पाच गणपती; जाणून घ्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आणि महत्व

मोठ्या थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात या गणपतींची मिरवणूक निघते

पुण्यातील मानाचे पाच गणपती (संग्रहित-संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात अष्टविनायक, विदर्भात आठ गणपती, मुंबईचा सिद्धिविनायक तसेच पुण्यात 5 मानाचे गणपती प्रसिद्ध आहेत. पुण्यातील इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती एका बाजूला आणि हे पाच मानाचे गणपती एका बाजूला, असा यांचा थाट असतो. पुण्यात याच पाच गणपतींच्या आगमनाने गणेशोत्सवाची सुरुवात होते तर विसर्जनावेळीही याच गणपतींची मिरवणूक पहिल्यांदा निघते. कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत), तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे ते गणपती होय. मोठ्या थाटामाटात, ढोल-ताशांच्या गजरात या गणपतींची मिरवणूक निघते. उद्या (2 सप्टेंबर) सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2019) चला पाहूया या पाच गणपतींचे महत्व

हा गणपती पुण्याचे ग्रामदैवत आहे. 1636 साली पुण्यात मोठ्या डौलात लालमहाल उभा राहिला.  त्याच्या शेजारीच असलेल्या कसबा पेठेत, कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. राजमाता जिजाऊ यांनी या मंदिराचा गाभारा बांधला. या मूर्तीचा मूळ आकार तांदळाएवढा होता असे सांगितले जाते. या मूर्तीला हात पाय नसून फक्त मुखवटा आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. या गणपतीला गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन अशा दोन्ही ठिकाणी पहिले स्थान आहे .

तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवता आहे त्यामुळे इथल्या गणपतीला मानाचे दुसरे स्थान आहे. कसब्या पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर तांबडी जोगेश्वरी हे मंदिर आहे. भाऊ बेंद्रे यांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली. इथल्या मंदिरातील गणपतीची मूर्ती दरवर्षी विसर्जित केली जाते.

1887 म्हणजे टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करण्याआधीच या मंडळाच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. पूर्वी हा गणपती तालमीत बसवला जायचा मात्र काळाच्या ओघात तालिमी नष्ट झाल्या असल्या तरी, या मंडळाचा गणेशोत्सव चालू आहे. आश्चर्य म्हणजे या उत्सवाची सुरुवात हिंदू आणि मुस्लीम लोकांनी एकत्र येऊन केली होती, (हेही वाचा: Ganeshotsav 2019: गणपतीला प्रिय आहेत 20 पत्री; पूजेवेळी 'या' मंत्रोच्चाराने अर्पण करा वीस वृक्षांची पाने)

दक्षित तुळशीबागवाले यांनी 1901 साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. पुण्यात देखाव्यासाठी जे गणपती प्रसिद्ध आहेत त्यापैकी हा एक गणपती. या गणपतीला 80 किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत तर या मूर्तीचा उंची 13 फुट इतकी आहे. उद्या सकाळी 10 वाजता या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा मिरवणूक निघेल. गणपती चौक-नगरकर तालीम-अप्पा बळवंत चौक- बुधवार चौक- बेलबाग चौक-लक्ष्मी रोड असा यासाठी मार्ग असेल.

पुण्यातील पाचव्या मानाच्या गणपती उत्सवाची सुरुवात केसरी संस्थेंकडून 1994 साली झाली. त्याकाळी याच उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने होत असत. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

अशाप्रकारे पुण्यातील काही सर्वात जुन्या गणपती मंडळांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. उद्या सकाळी या सर्व गणपतींची प्रतिष्ठापना होईल.