Rajasthan Political Crisis: 'भाजप सोबत जाणार नाही' म्हणणारे सचिन पायलट कसे करणार पॉलिटिकल लँडिंग?

मात्र, 'आपण भाजप प्रवेश करणार नाही', असे स्पष्ट करत पायलट यांनी ही उत्सुकता लागलीच संपवली. त्यामुळे आता पायलट यांचे आता पुढे काय याबाबत पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sachin Pilot | (Photo Credit: Facebook)

राजस्थानच्या राजकारणात मोठा भूकंप करत सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी आपले पोलिटिकली विमान उडवले. मात्र, आता ते आपले विमान कुठे लँड करतात याबाबत उत्सुकता आहे. राजस्थानच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या सचिन पायलट यांना काँग्रेस (Congress) पक्षाने उपमुख्यमंत्री आणि पक्षातील इतर पदांवरुन दुर केले. त्यानंतर सचिन पायलट मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष (BJP) प्रवेश करणार काय? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र, 'आपण भाजप प्रवेश करणार नाही', असे स्पष्ट करत पायलट यांनी ही उत्सुकता लागलीच संपवली. त्यामुळे आता पायलट यांचे आता पुढे काय याबाबत पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.

पदावरुन हटवले पक्षातून नाही काढले

सचिन पायलट यांच्यावर कारवाई करत काँग्रेस पक्षाने त्यांना पदावरुन हटवले आहे. मात्र, संघटनेतून काढून टाकले नाही हे महत्त्वाचे. त्यामुळे जर पक्षांतर्गत समझोता झाला तर सचिन पायलट हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतू शकतात. काँग्रेस नेतृत्त्वावर दबाव टाकण्यासाठी पायलट यांनी ही खेळीही केलेली असू शकते. हा पक्षांतर्गत मामला आहे असे म्हणून त्यावर पडदाही टाकला जाऊ शकतो.

रस्ता अजूनही मोकळा

सचिन पायलट यांचा मार्ग अद्यापही बंद झाला नाही. काँग्रेसने त्यांच्यासाठी सर्व मार्ग खुले ठेवले आहेत. त्यामुळे पक्ष आणि पायलट यांच्यात योग्य संवाद झाला तर पुन्हा एकदा पायलट काँग्रेस पक्षातूनच नवी सुरुवात करु शकतात. सचिन पायलट हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शक्यतो काँग्रेस सोबत फारकत घेण्याचा मोठा निर्णय सचिन पायलट घेणार नाहीत. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: पायलट नसताना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात राजस्थान काँग्रेस सरकारचे विमान अस्थिर)

पायलट यांची विश्वासार्हता

सचिन पायलट यांना मोठा जनाधार नक्कीच आहे. हा जनाधार असल्यामुळेच पायलट इतके मोठे पाऊल उचलू शकले हे खरे. पण असे असले तरी पक्षानेही त्यांना बरेच काही दिले आहे. सचिन पायलट हे राजस्थानचे मुख्यमंत्री होते. राजस्थान काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. पक्षातील इतरही विविध पदांवर ते कार्यरत होते. काँग्रेसने देशभरातील ज्या काही तरुण नेतृत्वाला मोठा वाव दिला त्यात पायलट यांचे नाव अग्रक्रमावर येते. असे असताना थेट पक्षासोबत संघर्ष करुन पायलट यांनी आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खरे तर राजकारणात पायलट अत्यंत तरुण आहेत. त्या तुलनेत अशोक गहलोत यांना वयाच्या प्रचंड मर्यादा आहेत. त्यामुळे पायलट यांना राजकारणात भविष्य आहे. हे सांगायला कोणा ज्योतिशाची गरज नाही. असे असताना पायलट यांची आदळआपट आश्चर्यकारक ठरते.  (हेही वाचा, सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री, राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले- रणदीप सिंह सुरजेवाला यांची घोषणा)

भाजप प्रवेश

सचिन पायलट यांना भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा आहे. मात्र, आपण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मार्गाने जायचे नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चा आणि उत्सुकतेला आपोआपच पूर्णविराम मिळाला आहे.

स्वतंत्र चलो रे

शरद पवार, ममता बॅर्जी, जगमोहन रेड्डी यांच्याप्रमाणे आपला स्वतंत्र मार्ग चोखाळत एक नवा पक्ष अथवा नवी आघाडी करुन राजकारण करण्याचा मार्ग सचिन पायलट यांच्याकडे नक्कीच आहे. परंतू असे असले तरी त्यांच्या मागे किती आमदार आहेत हे स्पष्ट झाल्याशिवाय त्यांना हे पाऊल टाकता येणार नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी यांना स्वतंत्र पक्ष निर्माण करुन राजकारण करणे सोपे झाले कारण त्या वेळी काळही तसा होता. आजच्या काळात राजकारणाचे संदर्भ प्रचंड बदलले होते. त्यामुळे नव्या वाटेने सुरुवात करणे सोपे नक्कीच आहे. परंतू, त्या वाटेवर टिकून राहणे हे प्रचंड जिकीरीचे आणि कष्टाचे आहे.

दरम्यान, राजस्थान विधानसभेची एकूण सदस्य संख्या 200 आहे. कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी किंवा सरकार चालवण्यासाठी 101 आमदारांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. काँग्रेस आमदारांची एकूण संख्या 107 इतकी आहे. सचिन पायलट यांचा दावा असा की त्यांना 25 आमदारांचा पाठिंबा आहे. दुसऱ्या बाजूला अशोक गहलोत यांचा दावा असा की त्यांना 102 आमदारांचा पाठींबा आहे. यात काही अपक्षांचाही समावेश आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा दावा जरी गृहीत धरला तरी अशोक गहलोत यांचे सरकार कायम राहण्याची शक्यता स्पष्ट दिसते. असे असले तरी आकडेवारी स्पष्ट सांगते की, गहलोत यांचे सरकार अल्पमतात आहे. इतकेच काय पायलट यांनी काँग्रेसला बाजूला ठेऊन जरी काही वेगळा विचार केला आणि नवे सरकार सत्तेवर आले तरी त्यावरही अल्पमताची टांगती तलवार कायम असणार आहे.