Covovax Vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची दुसरी कोरोना विषाणू लस 'कोव्होवॅक्स'ची क्लिनिकल ट्रायल सुरु; जाणून घ्या कधी येणार बाजारात

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आणि कोविशिल्ड सारखी प्रभावी कोरोना विषाणू लस देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute), येत्या काही महिन्यांत आणखी एक कोरोना लस आणण्याची तयारी करत आहे.

Adar Poonawalla (PC - PTI)

गेल्या एक वर्षांपासून भारत कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. यावर्षी व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या लस बाजारात आल्याने सध्या महामारीवर विजय मिळवला जाऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक आणि कोविशिल्ड सारखी प्रभावी कोरोना विषाणू लस देणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute), येत्या काही महिन्यांत आणखी एक कोरोना लस आणण्याची तयारी करत आहे. सीरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी शनिवारी सांगितले की, कोविड-19 ची पुढची लस कोव्होवॅक्सची (Covovax) क्लिनिकल चाचणी भारतात सुरू झाली आहे.

सीरमची कोव्होवॅक्स यावर्षी सप्टेंबरपर्यंत बाजारात येऊ शकते अशी अपेक्षा पूनावाला यांनी व्यक्त केली. नोव्हॅवॅक्स (Novavax) आणि सीरम संस्था ही लस तयार करत आहेत. आफ्रिकन आणि ब्रिटनच्या व्हेरिएंटवरही याची ट्रायल केली गेली आहे. एकूणच ही लस 89 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. यापूर्वी अपेक्षा होती की नोव्हॅवॅक्स जूनपर्यंत बाजारात ही लस घेऊन येईल, परंतु शनिवारी पूनावाला म्हणाले की, सप्टेंबर 2021 पर्यंत ही बाजारात दाखल होईल. सीरमची ही दुसरी लस आहे, ज्याला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने चाचणीसाठी मंजूरी दिली आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकन लस कंपनी नोव्हॅवॅक्स इंक. ने सीरमसोबत परवाना करार जाहीर केला. नोव्हॅव्हॅक्सने आपली कोविड-19 लस 'एनव्हीएक्स-सीओ 2373 विकसित आणि विक्री करण्यासाठी हा करार केला आहे. भारत आणि निम्न व मध्यम उत्पन्न गटातील देशांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. (हेही वाचा: Coronavirus in India: महाराष्ट्रासह 'या' 6 राज्यात कोरोना विषाणूच्या 80 टक्के प्रकरणांची नोंद; जाणून घ्या देशातील स्थिती)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी रोजी कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत सीरम आणि भारत बायोटेक यांच्या अनुक्रमे कोविशील्ड व कोवॅक्सिन जनतेला दिल्या जात आहेत. सर्व प्रथम, भारत सरकारने आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कामगारांना लसीचे डोस दिले. आता 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली जात आहे.