Covid-19 3rd Wave: कोविड-19 बाबत ICMR चा इशारा- ऑगस्टच्या अखेरीस येईल तिसरी लाट, दररोज 1 लाख प्रकरणे नोंदवली जातील

अनेक राज्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि पर्यटन स्थळांवरील वाढणारी गर्दी पाहून आता सर्व काही पहिल्यासारखे झाले आहे असे दिसत आहे. मात्र तसे नाही.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, अशात तिसऱ्या लाटेचा (Covid-19 3rd Wave) इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि पर्यटन स्थळांवरील वाढणारी गर्दी पाहून आता सर्व काही पहिल्यासारखे झाले आहे असे दिसत आहे. मात्र तसे नाही. लोकांच्या निष्काळजीपणामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती वेगाने चिघळत आहे. अनेक राज्यांत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) चे मुख्य वैज्ञानिक प्राध्यापक समीरन पांडा यांनी कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, ऑगस्टमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल व त्यावेळी देशात दिवसाला अंदाजे 1 लाख प्रकरणे नोंदविली जातील. तिसऱ्या लाटेचा इशारा देताना इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डिव्हिजन ऑफ एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिजीज विभाग प्रमुख डॉ. समीरन पांडा म्हणाले की, जर व्हायरसने आपली रूपे बदलली नाहीत तर तो पहिल्या लाटेप्रमाणे असेल, परंतु जर विषाणूने नवे व्हेरिएंट तयार केले तर परिस्थिती खूप वाईट बनू शकते.

ते पुढे म्हणाले की, येणारी लाट दुसर्‍या वेव्हइतकी विनाशकारी ठरणार नाही. मात्र कमी लसीकरण दर आणि लॉकडाऊनमधील शिथिलता यामुळे कोरोना प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होऊ शकते. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा कितपत धोका असेल हे जाणून घेण्यासाठी, इम्पीरियल कॉलेज लंडन आणि आयसीएमआरने गणिताच्या मॉडेलचा आधार घेतला आहे. प्रोफेसर पांडा म्हणाले, सद्य परिस्थिती पाहता तिसरी लाट आल्याचे आम्ही म्हणू शकतो. जर तिसरी लाट थांबवायची असेल तर लोकांनी गर्दी करणे थांबवले पाहिजे व सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. (हेही वाचा: देशात लहान मुलांवर कोवॅक्सिनच्या ट्रायलसाठी दुसरा डोस देण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात होणार पूर्ण)

प्राध्यापक पांडा यांनी सांगितले की, भारताला मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेची गरज आहे. या काळात शक्यतो तितका प्रवास टाळावा असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग दर 3.8 टक्के आहे, तर केरळमध्ये तो 10.4 आहे. या व्यतिरिक्त, आंध्र प्रदेश, ओडिशा, गोवा, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या ठिकाणीही संसर्ग दर तीन टक्क्यांहून अधिक आहे. सिक्कीममध्ये देशात सर्वाधिक 20 टक्के संसर्ग दर आहे.