BMTC Bus Driver Heart Attack: वाहन चालवताना बीएमटीसी चालकास हृदयविकाराचा झटका; वाहकाने प्रसंगावधान दाखवत थांबवली बस
यशवंतपूरजवळ वाहन चालवित असताना एका बीएमटीसी चालकाला हृदयविकाराचा झटका आला, परंतु वेगवान विचार करणाऱ्या वाहकाने बस थांबवून पुढील दुर्घटना टाळली.
बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाची (BMTC) बस हाकताना 39 वर्षीय चालकास हृदयविकाराचा तीव्र झटका (Cardiac Arrest) आला. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. किरण नेलमंग असे चालकाचे नाव आहे. दरम्यान, सदर बाब वाहकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान दाखवत बस ( Bus Accident) तातीडीने थांबवली. ज्यामुळे संभाव्य धोका टळला. ही घटना यशवंतपूर येते सोमवारी (11 नोव्हेंबर) घडली. बीएमटीसी डेपो 40 मधील ही बस घेऊन कर्तव्यावर असलेला चालक नेलमंग हा यशवंतपूरच्या दिशेने निगाला होता. दरम्यान, त्याला छातीत तीव्र वेदना सुरु झाल्या. त्याने याबाबत वाहकास कल्पना दिली. मात्र, पुढच्या काहीच वेळात वाहन सुरुच असताना तो अचानक बेशुद्ध पडला.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
वाहन हाकताना चालक किरण नेलमंग बेशुद्ध पडत असल्याचे वाहकाच्या लक्षात येताच त्याने बसचा ताबा घेतला. पुढच्या काहीच क्षणात बस जागेवर थांबली. ज्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि संभाव्य दुर्घटनाही टळली. बस थांबविण्यात जर यश आले नसते तर, मोठा अनर्थ घडू शकला असता. वाहकाच्या प्रसंगावधानामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर घटना बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आलेल्या किरण नेलमंग यांस तातडीने बंगळुरु येथील रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. आपत्कारीलन स्थितीमध्ये प्रवाशांचे आणि रस्त्यावरील इतरांचे नुकसान होण्यापासून रक्षण केल्याबद्दल बीएमटीसीच्या अधिकाऱ्यांनी वाहकाच्या कृतीचे कौतुक केले आहे. (हेही वाचा, Bus Driver Dies While Driving: बेंगळुरू येथे प्रवाशांनी भरलेली बस चालवताना चालकाला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Video))
बीएमटीसी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता वाढली
दरम्यान, ही घटना बीएमटीसी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या गंभीर धोक्यांना अधोरेखित करते, असे अभ्यासकांचे मत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या आरोग्य मूल्यांकनात असे दिसून आले आहे की बीएमटीसीचे 40% पेक्षा जास्त कर्मचारी, विशेषतः 45-60 वयोगटातील कर्मचाऱ्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा उच्च धोका आहे. जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेसने केलेल्या मूल्यांकनात 7,635 कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाच्या पातळीबाबत माहिती मिळाली. (हेही वाचा, Bus Driver Heart Attack: बस चालवताना चालकाला हृदयविकाराचा धक्का, मृत्यूपूर्वी काहीच क्षण आधी वाचवले 60 प्रवाशांचे प्राण)
चालक आणि वाहकांच्या कामाच्या वेळा नेहमीच भिन्न भिन्न असतात. सहाजिकच त्यांचा आहार, विश्रांती आणि शारीरिक, मानसिक व्यायाम यांमध्ये सातत्य नसते. सततच्या ताणामुळे अनेकदा चालक आणि वाहकांमध्ये व्यसनाधिनताही आढळते. त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होत असतो. उल्लेखनीय म्हणजे शरीराच्या आतमध्ये होणारे बदल बाह्य शरीरावर दिसतातच असे नाही. त्यामुळे त्याकडे विशेषत: दुर्लक्ष होते. त्याचा परीणाम म्हणून शरीरामध्ये आणिबाणी निर्माण होते, असे अभ्यासक सांगतात.