अयोध्या प्रकरणात राम मंदिराच्या बाजूने निकाल येण्यास फायद्याचे ठरले 'हे' 3 महत्वाचे मुद्दे
राम मंदिराच्या बांधणीला हिरवा कंदील देत सोबतच मशिदीसाठी सुद्धा वैकल्पिक 5 एकर जागा देण्याच्या अंतिम निर्णयाने आज या खटल्याची समाप्ती झाली. आजच्या या निकालात राम मंदिराच्या बाजूने निर्णय येण्यात 3 मुख्य युक्तिवाद समोर आले आहेत, त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..
मागील 125 वर्षाचा इतिहास असणारा अयोध्या अयोध्या (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) प्रकरणाचा खटला आज 9 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. राम मंदिराच्या बांधणीला हिरवा कंदील देत सोबतच मशिदीसाठी सुद्धा वैकल्पिक 5 एकर जागा देण्याच्या अंतिम निर्णयाने आज या खटल्याची समाप्ती झाली आहे. वास्तविक ज्या खटल्यामुळे देशभरात एकेकाळी रान माजले होते त्या खटल्याच्या अंतिम निर्णयानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र सद्य परिस्थितीत अपेक्षेच्या उलट अशा प्रतिक्रिया देशात उमटत असून दोन्ही पक्षकारांनी निर्णयाची सामंजस्याने स्वागत केले आहे. यापूर्वी देखील 2010 मध्ये अयोध्या जमीन वाद हा तिन्ही पक्षकारांना समसमान वाटा देऊन संपवण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र यावर सर्वांची संमती न झाल्याने हा वाद पुढे नेण्यात आला मात्र आज अखेरीस सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्या समवेत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल मार्गी लावला.
आजच्या या निकालात राम मंदिराच्या बाजूने निर्णय येण्यात 3 मुख्य युक्तिवाद समोर आले आहेत, त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..
1) मशिद मोकळ्या जागेवर बांधण्यात आली नव्हती!
अयोध्या प्रकरणी मुस्लिम पक्षकाराने केलेल्या मुख्य दाव्यानुसार, मंदिर तोडून त्याच ठिकाणी मशिद बनवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुरातत्व खात्याच्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा दावा थेट फेटाळून लावला. याउलट मशिद मोकळ्या जागेवर बनवण्यात आली नसून त्याखाली विशिष्ट बांधकाम होते आणि हे बांधकाम म्हणजे १२ व्या शतकातील मंदिर असल्याचे पुरातत्व खात्याने म्हंटले आहे. यांनंतरही न्यायालायने पुरातत्व विभागाच्या दाव्याचा संदर्भ घेऊ नये असे मुस्लिम पक्षाचे सांगणे होते मात्र, हे निष्कर्ष नजरेआड करू शकत नाही, असे सांगून न्यायालयाने हा युक्तिवाद मार्गी लावला.
2) 1856 आधी नमाज पठण झाल्याचे पुरावे नाहीत
मुस्लिम पक्षकारांच्या दाव्यानुसार, 1934 ते 1949 पर्यंत वादग्रस्त जागेवर नमाज पठण होत होते. अर्थात, हा दावा न्यायालायने मेनी केला होता. मात्र १८५६ आधी याच ठिकाणी नमाज पठण झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत उलट वादग्रस्त जागेचा बाह्य चौथरा हिंदूंच्या ताब्यात होता व तिथे हिंदूंमार्फत पूजाअर्चा केली जायची. हे समोर आले.
3) रामजन्म भूमीच्या दाव्याला विरोध नाही!
अयोध्येत रामाचा जन्म झाला होता, या दाव्याला कोणीही आक्षेप घेतला नाही. हिंदू पक्षकारांनी ऐतिहासिक ग्रंथांचे संदर्भ दिले. परिक्रमेचे पुरावे दिले. चौथरा, सीता रसोई आणि भंडाऱ्यांच्या उपस्थितीचे दावे देखील सिद्ध करण्यात हिंदू पक्षकारांना यश आले.
Ayodhya Case: Watch Brief History
दरम्यान, अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल देताना मुख्य वादग्रस्त भूमी ही रामल्लाच्याच हक्काची असल्याचे मान्य केले आहे. पुढील तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करून मंदिर बांधणीस सुरुवात करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या निर्णयाने आज देशभरातील मोठा वाद संपुष्टात आल्याचे म्हंटले जात आहे.