काय सांगता? तब्बल 20 वर्षांनंतर गावात आला शिक्षक; बदली करून घेऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्वतः बांधला 6 किमीचा रस्ता

जवळजवळ 50 दिवसांच्या मेहनतीनंतर खडबडीत कच्चा रस्ता जवळपास पूर्णत्वास आला.

Road | Representational image (Photo Credits: pxhere)

राजस्थानच्या उदयपूरमधील (Udaipur) एका दुर्गम खेड्यातील ग्रामस्थांनी आपल्या गावातील एकमेव शिक्षकासाठी तब्बल 6 किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. या गावात 20 वर्षांनंतर एक शिक्षक आला होता व हा शिक्षक गावातच राहावा किंवा इथल्या खराब मूलभूत पायाभूत सुविधांमुळे बदली करू घेऊ नये म्हणून ग्रामस्थांनी हा सहा किलोमीटरचा रस्ता बांधला आहे. पिपलीखेत असे या गावाचे नाव असून ते जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे. या गावात 200 कुटुंबे राहतात जी रस्ते, वीज आणि दूरसंचार संपर्क यासारख्या मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहेत.

याआधी 2002 मध्ये शिक्षक मित्र योजनेंतर्गत एकच कंत्राटी शिक्षक असलेली प्राथमिक शाळा शासनाने या गावासाठी मंजूर केली होती. मात्र, आतापर्यंत या गावात एकही शिक्षक आला नव्हता. तब्बल 20 वर्षांनी जून 2022 मध्ये शाळेला समर्थ मीना नावाचा कायमस्वरूपी शिक्षक मिळाला. शिक्षक म्हणून मीनाची ही पहिलीच पोस्टिंग असल्याने त्यांना या गावात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे माहीत नव्हते. कारण गावात अनेक मुलभूत गोष्टींचा कमतरता आहे.

याबाबत समर्थ म्हणतात, शाळेत येण्यासाठी त्यांना गुडघाभर पाणी असलेली नदी आणि खडबडीत असा सहा किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो. या ठिकाणी येण्यासाठी दुसरी व्यवस्था नाही. सर्व अडचणींना तोंड देत समर्थ यांनी गावात एक वर्ष घालवले. या काळात त्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करून शाळेचे पुनरुज्जीवन सुरू केले. ते जेव्हा या शाळेत आले तेव्हा इथे फक्त 32 विद्यार्थी होते आणि लवकरच ही संख्या 70 वर पोहोचली.

मात्र, इथले रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटीची अडचण पाहता समर्थ बदली करून घेण्याचा विचार करत होते. या वर्षी जूनमध्ये, रस्त्याच्या समस्येमुळे समर्थ गावातून बदली करून घेऊ इच्छित असल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यानंतर त्यांनी बैठक बोलावून समर्थ आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापर्यंत रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा: Rajasthan Dalit Boy Suicide: राजस्थानमध्ये दलित मुलाचा वर्गात लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; घटनेने परिसर हादरलं)

दुसऱ्याच दिवशी यासाठी 35 जणांची टीम तयार झाली आणि गावकऱ्यांनी रस्ता बांधायला सुरुवात केली. जवळजवळ 50 दिवसांच्या मेहनतीनंतर खडबडीत कच्चा रस्ता जवळपास पूर्णत्वास आला. याबद्दल समर्थ म्हणतात, ‘ग्रामस्थांनी हा रस्ता बनवण्यासाठी केलेल्या मेहनतीबद्दल मला आनंद वाटतो आणि त्यांचा मी आभारी आहे. फक्त मलाच नाही तर विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांनाही याचा फायदा होईल. यातून ग्रामस्थांची शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्याची तीव्र इच्छा दिसून येते.’